Sun, Aug 18, 2019 14:22होमपेज › Pune › पुणे विभागात मुलीच चॅम्पियनः ९४.३४ टक्के मुली उत्तीर्ण 

पुणे विभागात मुलीच चॅम्पियनः ९४.३४ टक्के मुली उत्तीर्ण 

Published On: May 30 2018 6:59PM | Last Updated: May 30 2018 6:59PMपुणे : प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल आज(दि. ३०मे )जाहीर करण्यात आला. राज्याप्रमाणेच पुणे विभागाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली असून, विभागातून मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९४.३४ टक्के एवढे आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत निकालात घसरण झाली असून, विभागाचा निकाल ८९.५८ टक्के एवढा लागला आहे. गेल्यावर्षी पुणे विभागाचा निकाल ९१.१६ टक्के लागला होता. यावर्षी पुणे विभाग राज्यात तिसर्‍या स्थानावर आहे. दरम्यान, शंभर टक्के निकाल लागलेली सर्वाधिक कनिष्ठ महाविद्यालये पुणे विभागातच आहेत.

पुणे विभागात पुणे, अहमदनगर आणि सोलापूर अशा तीन जिल्ह्यांचा समावेश होतो. यावर्षी पुणे विभागातून तब्बल २ लाख ३५ हजार ७४७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख ३५ हजार ५०२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यातील २ लाख १० हजार ९६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी ८९.५८ टक्के एवढी आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत सुमारे दोन टक्यांनी पुणे विभागाचा निकाल घसरला असून गेल्यावर्षी विभागाचा निकाल ९१.१६ टक्के एवढा लागला होता. 

पुणे विभागातून दरवर्षी प्रमाणेच याहीवर्षी मुलींची सरशी झाली आहे. विभागातून एकूण १ लाख २ हजार ६२८ विद्यार्थींनींनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ९६ हजार ८२३ विद्यार्थींनी उत्तीर्ण झाल्या. विभागातून मुलींच्या उत्तीर्णाचे प्रमाण ९४.३४ टक्के एवढे आहे. तर विभागातून १ लाख ३२ हजार ८७४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ लाख १४ हजार १४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विभागातील मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८५.९० टक्के एवढे आहे.

विभागातील ३०.७२ टक्के पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण ९ हजार ९५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी २ हजार ७९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.