Mon, Jun 17, 2019 02:18होमपेज › Pune › लग्न नको...आई वडिलांविरोधात मुलीची तक्रार

लग्न नको...आई वडिलांविरोधात मुलीची तक्रार

Published On: Apr 18 2018 7:12PM | Last Updated: Apr 18 2018 6:55PMपिंपरी : प्रतिनिधी 

मुलीची इच्छा नसताना देखील तिला लग्नासाठी तयार केलेल्या अनेक घटना समाजात घडत असतात. आई-वडिलांच्या इच्छेसाठी अनेक मुलींना हे सहन देखील करावे लागते, आणि लग्नाच्या बोहल्यावर चढावे लागते. मात्र, पिंपरीत एका रणरागीणीने यासर्व घटनेला छेद दिला आहे.

या मुलीला महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण करायचे होते. तिची शिकायची इच्छा असताना तिच्या इच्छेविरुध्द आई-वडिल लग्न करण्याचा प्रयत्न करत होते. याबाबत या २० वर्षीय तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. भोकरी येथे हा प्रकार घडला असून मुलीने आपल्या आई, वडील, मामा आणि आत्या यांच्या विरुध्द पोलिसात तक्रार दिली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, पिडीत तरुणीचे बारावीपर्यंत शिक्षण झाले असून तिला उच्च शिक्षण घ्यायचे आहे. परंतु तिच्या आई, वडील, मामा आणि आत्या यांनी तिच्या लग्नाचा तगादा लावला होता. तर तिच्या मामा व आत्याने तिला एक स्थळदेखील आणले होते. इतकेच नाही तर संबंधित तरूणीस कोणतीही पूर्वकल्पना न देता तिचा विवाह ठरविण्यात आला होता. 

या विवाहासाठी तिची इच्छा नसताना 'आम्हाला आमचे ओझे कमी करायचे आहे' असे म्हणत आई-वडील तिच्यावर दबाव टाकत होते. तर, 3 डिसेंबर 2017 रोजी संबंधित युवतीचा साखरपुडा देखील केला. 22 एप्रिल 2018 रोजी तिच्या लग्नाची तारीख ठरवत लग्नपत्रिकाही छापण्यात आल्या. मात्र संबंधित तरूणीचा लग्नास पहिल्यापासूनच विरोध असल्याने लग्न न करण्याच्या भूमिकेवर ही तरुणी ठाम होती.

यासर्व प्रकाराला कंटाळून संबंधित तरूणीने आई, वडील, आत्या आणि मामा यांच्याविरुद्ध पोलिसांकडे लेखी तक्रार दिली आहे. पोलिसांत तक्रार दिल्यानंतर मंगळवार (दि. 17 एप्रिल) पासून तिने आई-वडिलांचे घर सोडले आहे. या घटनेचा पोलिस अधिक तपास करत आहेत.

 

Tags : pimpri, pimpri news, crime, marriage, girl file Complaint,