Tue, May 21, 2019 18:30होमपेज › Pune › शासकिय भक्तनिवासाची प्रतीक्षाच

शासकिय भक्तनिवासाची प्रतीक्षाच

Published On: Jul 01 2018 2:15AM | Last Updated: Jul 01 2018 1:43AMदेहूरोड : उमेश ओव्हाळ

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत देहूत अनेक विकासकामे शासनाच्यावतीने करण्यात आली. यामध्ये भाविकांच्या निवासासाठी  भक्तनिवास आणि व्यापार संकुलाचा समावेश आहे. ही कामे पूर्ण होऊन सहा महिन्यांहून अधिक काळ उलटला आहे; पण अद्याप त्याचे हस्तांतरण झाले नाही. व्यापारी संकुलाबाबत फार आक्षेप नाहीत.  पण भक्तनिवास यात्रेच्या काळात भाविकांना उपलब्ध व्हावे अशी मागणी करण्यात येत आहे.

 तीर्थक्षेत्र विकास आराखडयांतर्गत देहूत सुमारे 179 कोटींची विविध विकासकामे करण्यात आली. यातील काही कामे पूर्ण झाली असून काही प्रगतीपथावर आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकारात तीर्थक्षेत्र विकासाचे हे काम केले जात आहे. 2013 मध्ये या कामाला प्रत्यक्षात सुरूवात झाली. यामध्ये रस्ते, नदीवरील दोन पूल, नदीघाट, पदपथ, वैकुंठस्थान मंदिर परिसर विकास, सुशोभिकरण, मुख्य मंदिर आणि जन्मस्थान मंदिर विकसित करणे व सुशोभिकरण आदी कामांचा मुख्यत्वे समावेश होता.  यातील परिसर विकास या विषयात वैकुंठस्थान परिसर व विकास करण्यात येणार होता. यामध्ये महाद्वार बांधणे, भक्तनिवास उभारणे, अन्नछत्र, तुकाराम महाराज जीवन संग्रहालय, सभामंडप, चप्पल स्टँड आदी कामांचा समावेश होता. कामासाठी सुमारे नऊ कोटींचा प्रस्तावित खर्च होता. यापैकी भक्तनिवास आणि महाद्वाराचे काम पूर्ण झाले आहे. तुकाराम बीज सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर हे काम पूर्ण करण्याची मागणी होती. त्यानुसार मार्च अखेरीस ते पूर्णही झाले. मात्र, अद्यापही ते भाविकांसाठी उपलब्ध होऊ शकले नाही. 

या वास्तूचा ताबा अजुनही शासनाकडे आहे. त्यामुळे पुढील काळात येथील कारभार कोण पाहणार असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. दरम्यान, हे भक्तनिवास यावर्षी पालखीसोहळ्यानिमित्त देहुत येणार्‍या भाविकांना निवासासाठी उपलब्ध व्हावे, अशी मागणी पालखीसोहळा प्रमुख आणि विश्‍वस्तांनी नुकतीच एका शासकिय बैठकीत केली होती.

ही मागणी विचाराधिन असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले होते. मात्र, यासंदर्भात अद्याप तरी कुठलही हालचाल सुरु असल्याचे दिसत नाही.  यंदा भाविकांसाठी भक्तनिवास खुले करणे अत्यावश्यक झाले आहे, अशी मागणी सुनील दामोदर मोरे यांनी केली.