Mon, Apr 22, 2019 11:43होमपेज › Pune › ‘युवा माहिती दूत’ सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवणार

‘युवा माहिती दूत’ सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवणार

Published On: Aug 15 2018 12:59PM | Last Updated: Aug 15 2018 1:01PMपुणे : प्रतिनिधी

माहिती व जनसंपर्क विभागाचा ‘युवा माहिती दूत’ हा उपक्रम अत्यंत नावीन्यपूर्ण आणि उपयुक्त असून या माध्यमातून शासनाच्या कल्याणकारी योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचतील असा विश्वास पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज व्यक्त केला. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, उच्च शिक्षण विभाग आणि तंत्र शिक्षण विभाग व युनिसेफच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या ‘युवा माहिती दूत’ या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते येथील विधान भवनाच्या सभागृहात झाला. यावेळी ‘युवा माहिती दूत’च्या ॲपचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 

पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, राज्य शासनातर्फे विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. शासनाच्या विकास योजनांची माहिती गाव पातळीपर्यंत लाभार्थींना मिळावी या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा हा उपक्रम नावीन्यपूर्ण आहे. या उपक्रमात युवकांना सामावून घेतल्यामुळे ही योजना अधिक प्रभावीपणे राबविली जाईल. या उपक्रमात तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. 

उपसंचालक मोहन राठोड म्हणाले, हा उपक्रम ऐच्छिक असून, समाजकार्याची आवड असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थी युवा माहिती दूत म्हणून कार्य करता येणार आहे. माहिती दूत त्यांच्या तालुक्यातील 50 कुटुंबांशी समक्ष संपर्क साधुन शासकीय योजनांची माहिती देणार आहेत. युवा माहिती दुतांची नोंदणी महासंचालनालयाने तयार केलेल्या ॲपवर ऑनलाईन होणार आहे. हे ॲप प्ले स्टोअरवर विनामुल्य उपलब्ध आहे. प्ले स्टोअर वरुन हे ॲप डाऊनलोड करुन विद्यार्थ्यांना युवा माहिती दूत म्हणून नोंदणी करता येणार आहे. या युवा माहिती दूतांना विकास योजनांवरील व्हीडीओ क्लिप, शासकीय योजनांची माहिती असणाऱ्या पुस्तिका, घडीपत्रिका महासंचालनालयामार्फत पुरविण्यात येणार आहेत, तरी युवकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी ‘युवा माहिती दूत’ या उपक्रमावरील ध्वनीचित्रफित दाखविण्यात आली.

शासन अनुदानित वैयक्तिक लाभाच्या योजना प्रस्तावित लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याकरिता त्यांच्याशी थेट संपर्क साधण्याची आवश्यकता असते. दारिद्ररेषेखालील तसेच ग्रामीण वा दुर्गम भागातील अशिक्षित व अर्धशिक्षित लाभार्थ्यांपर्यंत त्यांच्यासाठी असलेल्या योजनांची माहिती पोहचविण्याला वृत्तपत्रे, रेडिओ आणि दूरचित्रवाणी वाहिन्या या माध्यमांना मर्यादा येतात. शासकीय योजना प्रस्तावित लाभार्थ्यापर्यत दुहेरी संवादातून त्यांच्यापर्यत प्रभावीपणे पोहचविण्यास राज्यातील समाजकार्याची आवड असलेल्या उत्साही तरूण वर्गाचे साहाय्य घेण्याच्या हेतूने ‘युवा माहिती दूत’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

1)प्रत्येक महाविद्यालयातील सहभागी विद्यार्थ्यांसाठी त्या महाविद्यालयातील अध्यापक वा अध्यापकेतर अधिकारी/कर्मचारी यापैकी एक ‘मार्गदर्शक’ म्हणून नेमण्यात येईल. 

2) या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विशेष मोबाईल अॅप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. या मोबाईल ॲप्लीकेशनमध्ये प्रत्येक महाविद्यालयातील मार्गदर्शक, समन्वयक आणि सहभागी युवक यांचे अकाऊंट असेल. 

3) महाविद्यालयातील विद्यार्थी ’माहितीदूत’ होण्यासाठी स्वत:हून या ॲप्लीकेशनवर स्वत:च्या नावाची नोंदणी करतील.

4) युवकांनी प्रस्तावित लाभार्थ्यांना कोणत्या योजनांची माहिती द्यावी याकरीता तपशिल सांगणारा मजकूर/ व्हिडीओ/ एफएक्यू देण्यात आलेला आहे. त्याशिवाय योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, संबंधित शासकीय कार्यालयाचा संपर्क तपशिल असेल.

5) प्रस्तावित लाभार्थ्याची भेट घेतल्यानंतर ‘युवा माहिती दूत’ हे त्या लाभार्थ्यांचा तपशील आपल्या मोबाईलमधील ॲप्लीकेशनमध्ये नोंदवितील या तपशिलानुसार संबंधित योजनांची माहिती ॲप्लीकेशनमधून घेऊन प्रस्तावित लाभार्थ्याना समजून सांगतील.

6) लाभार्थ्यांना हे ॲप्लीकेशन डाउनलोड करण्यासाठी माहिती दूत मदत करतील. तसेच या ॲप्लीकेशनच्या माध्यमातून शासनाच्या सर्व योजना, उपक्रमांची माहिती लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी मिळणे शक्य होणार आहे.

7) माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि माहिती दूत यांमध्ये संदेशांची देवाणघेवाण, प्रशिक्षण, पुनर्विलोकन या ॲप्लीकेशनमार्फत होईल.

8) मार्गदर्शक, समन्वयक, माहिती दूत, प्रस्तावित लाभार्थी या सर्वांची नोंदणी मोबाईल क्रमांकाशी निगडीत असेल.

9) विविध समाजातील (शेतकरी, महिला, आदिवासी, अल्पसंख्यांक, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,) असलेल्या वैयक्तिक लाभाच्या किमान २५ ते ३० योजनांचा समावेश या उपक्रमासाठी केलेला असेल.