होमपेज › Pune › गणेशोत्सवामध्ये व्हाईट चॉकलेट मोदकाला मागणी (Video)

गणेशोत्सवामध्ये व्हाईट चॉकलेट मोदकाला मागणी (Video)

Published On: Sep 10 2018 8:49PM | Last Updated: Sep 10 2018 8:49PMपुणे ः नरेंद्र साठे

    गणेशोत्सवाची पुण्यात जय्यत तयारी सुरू असतानाच, यावर्षी विविध फ्लेवरसह मोदक मिठाईच्या दुकानांमध्ये दाखल झाले आहेत. गणराजाच्या आगमनाची चाहूल लागली की मोदकांची आवड असलेले पुणेकर ज्या-ज्या ठिकाणी उत्कृष्ट मोदक मिळतात, तिथे रांगा लावून खरेदी करतात.  अशा पट्टीचे खवय्ये असलेल्या पुणेकरांसाठी मोदकांसाठी विशेष ऑफर देखील काही मिठाई दुकानदारांनी देऊ केल्या आहेत. यावर्षी पुण्यातून परदेशात व्हाईट चॉकलेट या मोदकाला सर्वाधिक मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. 

     तर उकडीच्या मोदकांसाठी काही महिला बचत गटांनी देखील पुढाकार घेतला आहे. पुण्यात यावर्षी विविध फ्लेवरसह मोदक विक्रेत्यांनी ठेवले आहेत. त्यामध्ये मँगो, चॉकलेट, पिस्ता, स्ट्रॉबेरी, आँरेज, काजू, पंचखाद्य, मावा या प्रकारचे मोदक गणेशोत्सवासाठी तयार करण्यात आले आहेत. साधारण तीनशे रुपयांपासून ते बाराशे रुपये प्रति किलो मोदकांचे दर आहेत.

उकडीचे मोदक ः उकडीच्या मोदकांसाठी पुण्यातील अनेक मिठाईचे दुकाने प्रसिद्ध आहेत. परंतु यावर्षी महिला बचत गटांमधून देखील अनेक महिलांनी घरगुती उकडीचे मोदक तयार केले आहेत. या महिलांकडून काही मिठाई विक्रेत्यांनी देखील मोदक खरेदी केली आहेत. गणेशोत्सवानिमित्त उकडीचे मोदकांपासून महिलांना चांगला आर्थिक हातभार लागत आहे. काजू मोदक ः ज्यांना काजू मोदक आवडतात, ते गणपतीच्या दिवसांत या मोदकांच्या चवीसाठीच काजू मोदकची मागणी करत असल्याचे विक्रेते सांगतात. रंगेबेरंगी मोदकःमोदकांच्या पारंपरिक रंगाना बाजूला ठेवून गुलाबी, पिवळा, हिरवा अशा विविध रंगांचे मावे एकत्र करून हे रंगीत मोदक तयार करण्यात येतात. रंगाने आकर्षक आणि चवीला गोड असलेले हे मोदक लहान-मोठ्या आकारात मिळतात. डार्क चॉकलेट मोदक ः गणपतीच्या दिवसात मात्र इथे डार्क चॉकलेट मोदकांसाठी गर्दी होते. डार्क किंवा व्हाइट चॉकलेटचं आवरण आणि आत मध्ये ड्रायफ्रूट सारण असलेला हा मोदक खवय्यांमध्ये प्रसिद्ध आहे. कमी साखर आणि डार्क चॉकलेट असल्यामुळे साखरेचं वावगं असलेल्या मोदक प्रेमींनाही डार्क चॉकलेटचे हे मोदक आवडतात.