होमपेज › Pune › अभियांत्रिकी महाविद्यालयांचे भवितव्य धोक्यात

अभियांत्रिकी महाविद्यालयांचे भवितव्य धोक्यात

Published On: Jul 25 2018 1:38AM | Last Updated: Jul 25 2018 1:35AMपुणे : प्रतिनिधी 

राज्यातील ग्रामीण भागात अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याचा कल अतियश मंदावला आहे. काही महाविद्यालयांमध्ये प्रवेशाच्या तिसर्‍या फेरीअखेर केवळ 50 ते 100 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. त्यामुळे संस्थाचालकांना महाविद्यालये चालविणे अवघड झाले आहे. त्याचबरोबर अनेक महाविद्यालयांमध्ये मेकॅनिकल, सिव्हिल, इन्स्ट्रून्मेंट आदी विद्याशाखा बंद कराव्या लागणार आहे, अशी शक्यता तंत्रशिक्षण संचालनालयाच्या (डीटीई) अधिकार्‍यांनी वर्तविली आहे. त्यामुळे राज्यात अभियांत्रिकी महाविद्यालयांचे भवितव्यच धोक्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे.

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे राज्यातील सरकारी आणि खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानुसार प्रवेशाची तिसरी फेरी पूर्ण झाली आहे. यासंदर्भात तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या तीन वर्षात यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयात सर्वात कमी प्रवेश होण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांमध्ये विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या विद्याशाखांना पसंती होती.

मात्र, यंदाच्या वर्षी कॉम्प्युटर, आयटी, इलेक्ट्रीकल विद्याशाखांना विद्यार्थ्यांची पसंती आहे. त्यातुलनेत सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विद्याशाखा प्रवेशाच्याबाबत मागे पडल्या आहे. दरम्यान, मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नागपूर, कोल्हापूर आदी मोठ्या शहरांमधील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालये सोडल्यास राज्यातील इतर ठिकाणच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची स्थिती विदारक आहे. ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये तर तिसर्‍या फेरीअखेर केवळ 50 ते 100 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. यामध्ये देखील अधिक प्रवेश हे कॉम्प्युटर आणि आयटी विद्याशाखेत झाले आहेत. तर, सिव्हिल, मेकॅनिकल, इन्स्ट्रूमेन्टेशन विद्याशाखेत बोटावर मोजण्याइतक्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे या विद्याशाखा पुढील शैक्षणिक वर्षापासून बंद करण्यात येतील अशीच शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या काही वर्षात सुरू झालेल्या नवीन महाविद्यालयांमध्ये प्रत्येक विद्याशाखेत तर बोटावर मोजण्याइतक्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. त्यामुळे ही महाविद्यालये पुढील वर्षात बंद होण्याची दाट शक्यता तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अधिकार्‍यांनी वर्तविली आहे.