Sun, Jun 16, 2019 03:05होमपेज › Pune › मित्रानेच केला मित्रावर अ‍ॅसिड हल्ला

मित्रानेच केला मित्रावर अ‍ॅसिड हल्ला

Published On: Jan 23 2018 1:25AM | Last Updated: Jan 23 2018 12:40AMपुणे : प्रतिनिधी

सारस बागेजवळील आण्णा भाऊ साठे पुतळ्याच्या समोरील फुटपाथवरून चालत जाणार्‍या निवृत्त शिक्षकावर त्यांच्याच मित्राने अ‍ॅसिडने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. भरदिवसा आणि वर्दळीत सोमवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यात निवृत्त शिक्षक हे 12 टक्के भाजले असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोघेही एकमेकांची चांगले मित्र आहेत. दरम्यान या हल्ल्या मागचे कारण मात्र, समजू शकलेले नाही.

भारत खंडू साबळे (वय 60, रा. संचेती अपार्टमेंट, सिंहगड रोड) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या निवृत्त शिक्षकाचे नाव आहे. तर, मनोज चव्हाण (वय 45) असे हल्ला करणार्‍याचे नाव आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील जखमी भारत साबळे व आरोपी मनोज चव्हाण हे गेल्या आठरा ते वीस वर्षापासून मित्र आहेत. त्यांच कौटुंबिकही संबंध आहेत. दरम्यान जखमी साबळे हे एका शाळेतून प्राचार्य म्हणून निवृत्त झाले आहेत. तर, मनोज चव्हाण हा पुणे महापालिकेच्या टिळक रस्त्यावरील क्षेत्रिय कार्यालयात लिपीक या पदावर नोकरीस आहे. 

दरम्यान साबळे हे सोमवारी दुपारी सारसबागेजवळील आण्णा भाऊ साठे पुतळ्यासमोरील फुटपाथवरून पायी चालत जात होते. त्यावेळी चव्हाण याने त्यांच्या अंगावर बाटलीतून अ‍ॅसिडने हल्ला केला. यात साबळे यांचा चेहरा, मान व गळ्यावर अ‍ॅसिड पडल्याने भाजले आहे. यात ते 12 टक्के भाजले आहेत. दरम्यान चव्हाण हा तेथून पसार झाला. त्यानंतर साबळे यांनीच त्यांच्या मुलाला फोन करून चव्हाण याने अ‍ॅसिड फेकल्याची माहिती दिली. त्यानंतर त्यांना नागरिकांनी तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले. 

दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास रुग्णालयातून पोलिसांना खबर देण्यात आली. त्यानंतर स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी हा सर्व प्रकार समोर आला. त्यांनी साबळे यांच्या मुलाकडे चौकशी केली. त्यावेळी त्यांने पोलिसांना चव्हाण याच्याबाबत माहिती दिली. दरम्यान या हल्ल्या मागचे कारण मात्र, समजू शकलेले नाही. स्वारगेट पोलिस चव्हाणचा शोध घेत आहेत.