Mon, Mar 25, 2019 17:25होमपेज › Pune › बालके, वृद्धांना मिळणार मोफत स्वाइन फ्लूची लस

बालके, वृद्धांना मिळणार मोफत स्वाइन फ्लूची लस

Published On: Jan 24 2018 1:47AM | Last Updated: Jan 24 2018 12:59AMपुणे : प्रतिनिधी

गेल्या वर्षी स्वाइन फ्लूने सुमारे दीडशे जणांचा बळी घेतल्यानंतर आरोग्य विभागाला यावर्षी जाग आली आहे. यावर्षीपासून पाच वर्षाच्या आतील बालके आणि 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत स्वाइन फ्लूची लस देण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. याबरोबरच फुप्फुसाचे आजार, मुत्रपिंड आजार व यकृताचे आजार असलेल्या रुग्णांनाही ही लस देण्यात येणार आहे. ही लस महापालिकेच्या सर्व प्रसूतीगृहांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.यापूर्वी केवळ तीन महिने झालेल्या गर्भवती महिला, मधुमेही आणि उच्च र क्तदाब असणार्‍यांना मोफत लस देण्यात येत होती. मात्र याबरोबरच लहान बालके, वयोवृद्धांचा मृत्यूचा आकडा वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील 9 लाख संशयित रुग्णांची तपासणी केली होती.

त्यापैकी 703 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते तर 148 रुग्णांचा मृत्यू झाला होता. शहरात सर्वाधिक प्रादुुर्भाव झाल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने हा निर्णय  घेतला आहे.  गेल्या वर्षी जानेवारी ते डिसेंबरदरम्यान केवळ पुण्यातच नव्हे तर राज्यात स्वाइन फ्लूने धुमाकूळ घातला होता. यामध्ये राज्यात 22 लाख रुग्णांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी सहा हजार 144 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले होते. तर गेल्या वर्षी राज्यात 777 रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नाशिकसह, नागपुर, पुणे, अहमदनगर येथे रुग्णांचा सर्वाधिक मृत्यू झाला होता. पुण्यात सर्वाधिक प्रादुर्भाव झाल्याने बालके, वयोवृद्ध व इतरांना ही लस मोफत देण्यात येणार आहे. उरलेल्या राज्यातील जिल्ह्यांत असा निर्णय घेण्यात आला नसल्याची माहिती साथरोग विभागाचे राज्य सर्व्हेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे  यांनी दिली.