होमपेज › Pune › दोषी अधिकार्‍यांना ‘स्थायी’ देणार अभय? 

दोषी अधिकार्‍यांना ‘स्थायी’ देणार अभय? 

Published On: Jan 10 2018 1:59AM | Last Updated: Jan 10 2018 1:30AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता व  लिपिक अशा एकूण 9 दोषी अधिकार्यांच्या अपील अर्जाच्या अहवालावर निर्णय घेण्याचे विषय स्थायी समिती सभेपुढे ठेवण्यात आले; मात्र सलग तीन सभेत हे विषय तहकूब ठेवण्यात आले आहेत. स्थायी समितीकडून या अधिकार्यांना अभय देण्यात येईल की नाही, यासंदर्भात महापालिका वर्तुळात चर्चा रंगली आहे. 
महापालिकेचे विविध दहा अधिकारी विविध कारणांमुळे दोषी आढळल्याने त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई केली गेली आहे. त्या अधिकार्यांनी प्रशासनाकडे अपील अर्ज करून पुन्हा सेवेत घेण्याची विनंती केली आहे. हा विषय मंजुरीसाठी स्थायी समिती सभेपुढे ठेवण्यात येत आहे.  लिपिक अरुण जागडे यांनी 13 सप्टेंबर 2017 ला महापालिका प्रशासनाकडे अपील अर्ज केला आहे. कार्यकारी अभियंता संदेश चव्हाण, उपअभियंता माणिक चव्हाण, कनिष्ठ अभियंता महेश कावळे, अशोक आडसुळे, उपअभियंता नितीन देशमुख, अकबर शेख हे सर्व विद्युत विभागातील अधिकारी आहेत. त्या सर्वांनी 6 सप्टेंबर 2017 ला अपील अर्ज केला आहे. त्याचबरोबर विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता संदेश चव्हाण, कनिष्ठ अभियंता प्रकाश कातोरे, उपअभियंता एकनाथ पाटील, कनिष्ठ अभियंता दमयंती पवार यांनी 6 सप्टेंबर 2017 ला अपील अर्ज केला आहे. या सर्व दोषी अधिकार्यांच्या अर्जासह अहवाल अवलोकनासाठी स्थायी समिती सभेपुढे ठेवण्यात आले आहेत. समितीच्या 20 व 26 डिसेंबर 2017 व 4 जानेवारी 2018 च्या सभेत हे तीनही विषय तहकूब ठेवण्यात आले. सदर विषय न्यायालयीन बाब असल्याने ते तहकूब ठेवत असल्याचे समितीचे मत आहे; मात्र हे विषय फेटाळून न लावता, सलग तीन सभेत तहकूब ठेवण्यामागे अर्थकारण असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे. या अधिकार्यांना स्थायी समिती अभय देणार का, असा सवाल विचारला जात आहे. सदर विषय पुन्हा बुधवारी (दि.10) होणार्या सभेपुढे ठेवण्यात आला आहे.