Sun, Apr 21, 2019 05:47होमपेज › Pune › ‘महाराष्ट्रा’त फसवणुकीच्या तक्रारी

‘महाराष्ट्रा’त फसवणुकीच्या तक्रारी

Published On: Feb 08 2018 1:52AM | Last Updated: Feb 08 2018 1:07AMअमोल येलमार :पुणे

झटपट लाखो रुपये कमवून देणार्‍या ‘बिटकॉईन’ या आभासी चलनामध्ये गुंतवणूक करायला सांगून फसवणूक केल्याचे गुन्हे पुणे, नागपूर, नांदेड या ठिकाणी नोंद झाले आहेत. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये अशाप्रकारे फसवणूक होत असल्याच्या तक्रारी पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे आलेल्या आहेत. या तक्रारींची चौकशी करून त्या-त्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी दाखल झालेले गुन्हे आणि तक्रारी पाहता कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे आताच समोर आले आहे. दिवसेंदिवस हा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविलेली आहे.

‘बिटकॉईन’मध्ये गुंतवणूक केल्यास चांगल्या प्रकारचा परतावा मिळेल, असे सांगून ‘एजंट’ गुंतवणूकदारांना भुरळ पाडतात. त्यानंतर त्यांच्यासमोर आमिष तयार झाल्याने लाखो रुपयांची गुंतवणूक केली जाते. गुंतवणूक केल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या खात्यावरचे ‘बिटकॉईन’ परस्पर काढून घेणे, त्याची विक्री करणे अशा प्रकारे त्याची फसवणूक होते. हे ‘बिटकॉईन’ कोणी काढून घेतले याची माहिती मिळणे अशक्य आहे. अशा प्रकारे फसवणूक केल्याच्या अनेक तक्रारी पुणे सायबर शाखेकडे आलेल्या आहेत. याची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
संपूर्ण महाराष्ट्रभर अशा प्रकारे फसवणूक होत असून, त्याच्या तक्रारी पोलिसांकडे दाखल होत आहेत. यातूनच नागपूर, नांदेड आणि पुणे येथे गुन्हे दाखल झाले आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये तब्बल 100 कोटी रुपयांची फसवणूक केली असण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. नांदेड परिसरात शिक्षण घेतलेल्या एका उच्चशिक्षिताने अनेकांना मोहजाळात अडकवून गंडा घातला आहे. अशा प्रकारे अनेक ठिकाणी ‘बिटकॉईन’; तसेच ‘बिटकॉईन’च्या माध्यमातून फसवणूक केल्याचे समोर येत आहे.

पुणे सायबर शाखेकडेही असेच अनेक तक्रार अर्ज दाखल झाले आहेत. पोलिस याचा तपास करत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील एका ‘बड्या’ व्यक्तीचीही ‘बिटकॉईन’मधून कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल झाली आहे. या व्यक्तीचे 95 ते 100 ‘कॉईन’ परस्पर कोणीतरी काढून घेतले आहेत. सध्या एका ‘कॉईन’ची किंमत 8 लाख रुपये इतकी आहे. अशा प्रकारच्या तक्रारी दाखल होत आहेत. लाखो, कोट्यवधी रुपयांची फसवणूक होत आहे. यातील ‘एजंट’ची माहिती गुंतवणूकदारांकडे आहे; मात्र या ‘कॉईन’चा मुख्य सूत्रधार कोण आहे याचा कोणाला अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. वेगवेगळ्या ठिकाणी दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये वेगवेगळ्या एजंटांविरुद्धात गुन्हे दाखल झाले आहेत. काहींवर कारवाई करण्यात आली आहे; मात्र यातून पैसे मिळतील असे चित्र दिसत नाही.
‘बिटकॉईन’मध्ये गेल्या 17 महिन्यांत तब्बल 3.5 अब्ज डॉलर्सचे व्यवहार ‘क्रिप्टोकरन्सी’च्या माध्यमातून झाले आहेत. त्यामुळे प्राप्तिकर विभागाने गुंतवणूकदारांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. प्राप्तिकर विभागाने पुणे, बंगळूर, मुंबई, दिल्लीसह नऊ ‘एक्स्चेंज’मधून माहिती संकलित केल्यानंतर त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. 

यासंदर्भात प्राप्तिकर विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितलं की, ‘बिटकॉईन’ आणि इतर ‘व्हर्च्युअल करन्सी’मध्ये गुंतवणूक करणार्‍यांत ‘टेक्नोसॅव्ही’, युवा गुंतवणुकदार, ‘रिअल इस्टेट प्लेअर्स’, सराफ आणि आयटीएन्सचा समावेश आहे. याद्वारे काळ्या पैशांची विल्हेवाट लावणे; तसेच करचुकवेगिरी करण्याच्या पर्यायांचा वापर केला जात आहे. दर महिन्याला लाखो लोक ‘क्रिप्टोकरन्सी’मध्ये गुंतवणूक करत असल्याचे मत आर्थिक विषयातील जाणकारांचे आहे.

कोणत्याही प्रकारची नोंदणी नाही

‘बिटकॉईन’ आणि त्यासारख्या आभासी चलनाचे कोणतेच ‘रजिस्टेशन’ नसते. कोणीही अशा प्रकारे इंटरनेटच्या माध्यमातून असे ‘कॉईन’ तयार करू शकतात. याला शासनाचीही मान्यता नाही. त्यामुळे यामध्ये गुंतवणूक करणे हेच मुळात बेकायदेशीर आहे, तरी देखील शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले असून, वेगवेगळ्या प्रकार गुंतवणूकदारांवर टाच आणण्याचा प्रयत्न सुुरू आहे.