Thu, Apr 25, 2019 11:30होमपेज › Pune › राज्य राखीव पोलिस दलाच्या लेखी परीक्षेत गैरप्रकाराचा संशय?

राज्य राखीव पोलिस दलाच्या लेखी परीक्षेत गैरप्रकाराचा संशय?

Published On: Apr 29 2018 2:41AM | Last Updated: Apr 29 2018 2:19AMपुणे ः प्रतिनिधी

नांदेड पोलिस भरती प्रक्रियेतील गैरप्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली असताना आता असाच प्रकार पुण्यातल्या राज्य राखीव पोलिस दलाच्या परीक्षेतही झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. नांदेड, औरंगाबाद, जालन्यासोबतच पुण्यातील राज्य राखीव पोलिस दलाच्या परीक्षेतील उमेदवारांच्या उत्तरपत्रिका लिहून त्या मुख्य गठ्ठ्यात मिसळल्या आहेत.   

नांदेड पोलिसांनी या प्रकरणात एस. एस. जी. सॉफ्टवेअर कंपनीच्या कर्मचार्‍याला अटक केली आहे. राज्य राखीव दलाचे (एसआरपीएफ) दोन कर्मचारी आणि एका मध्यस्थाच्या मदतीने त्यांनी एकूण तीस उमेदवारांच्या उत्तरपत्रिका बदलण्यात आल्याची माहिती त्यांच्याकडून समोर आली आहे. 

नांदेडमधील 69 पोलिस शिपायांच्या जागांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. प्रवीण भटकर याने काही पोलिसांना हाताशी धरुन उमेदवारांना लेखी परीक्षेच्या वेळी उत्तरपत्रिका कोर्‍या ठेवण्यास सांगितले. 

त्यानंतर कोर्‍या उत्तरपत्रिकांवर उत्तरे लिहून त्या मुख्य उत्तरपत्रिकांच्या गठ्ठ्यात मिसळल्या. या उमेदवारांना 90 टक्के गुण मिळाले. नांदेड पोलिसांना संशय आल्याने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. त्यानंतर लेखी परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले. 

नांदेड पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत अकरा जणांना अटक केली आहे. आरोपींकडे केलेल्या चौकशीत प्रवीण भटकरने एस. एस. जी. सॉफ्टवेअर कंपनीतील कर्मचार्‍यांची मदत घेतली. त्यांच्याशी संगनमत करुन पुण्यातील वानवडी भागात असलेल्या राज्य राखीव पोलिस दलाच्या गट क्रमांक दोनमधील तीस उमेदवारांच्या उत्तरपत्रिका मुख्य उत्तरपत्रिकांच्या गठ्ठ्यात मिसळण्यात आल्याचे चौकशीत उघड झाले आहे. औरंगाबाद, जालना येथील राज्य राखीव दलाच्या परीक्षा केंद्रावरही, असे गैरप्रकार झाले असण्याची शक्यता आहे. नांदेड पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. प्रवीण भटकर हा ओएमआर कंपनीचा संचालक आहे. 

याबाबत माहिती घेतली असता नांदेडमध्ये गैरप्रकार झाल्याची माहिती मिळाल्याने चौकशी सुरू करण्यात आली असल्याचे राज्य राखीव पोलिस दलाचे पोलिस महानिरीक्षक सुरेशकुमार मेखला यांनी सांगितले.