Sun, Jul 21, 2019 15:09
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › मारुती सुझुकी शोरूममध्ये पावणेदोन कोटींची अफरातफर

मारुती सुझुकी शोरूममध्ये पावणेदोन कोटींची अफरातफर

Published On: Dec 29 2017 1:32AM | Last Updated: Dec 29 2017 1:28AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

मारुती सुझुकीच्या फातिमानगर येथील शोरूमचे सीनिअर मॅनेजर, रिलेशनशिप मॅनेजरसह तिघांनी कार खरेदीसाठी ग्राहकांना डिस्काउंट देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून घेतलेल्या सुमारे पावणेदोन कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला. जयेश उल्हास वेंगुर्लेकर, संदीप रंगनाथ शिंदे, शर्मा नावाची महिला असा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर कन्वरजितसिंह सेहगल (45, बाणेर) यांनी फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेहगल यांचे वानवडी परिसरातील फातिमानगर येथे मारुती सुझुकीचे नेक्सा ब्रॅण्डचे सेहगल ऑटो रायडर्स प्रा.लि. नावाचे शोरूम आहे. या शोरूममध्ये वेंगुर्लेकर हा शोरूममध्ये सीनियर रिलेशनशिप मॅनेजर, शर्मा ही रिलेशनशिप मॅनेजर आहे, तर संदीप शिंदे हा कंपनीचा डिलिव्हरी कॉर्डिनेटर आहे. ग्राहकांना डिस्काउंट देण्याचा बहाणा वेंगुर्लेकर आणि इतरांनी केला. ग्राहकांनी पूर्ण रक्‍कम भरलेली नसतानाही 40 जणांना त्यांनी गाड्या विकल्या.

त्याची पूर्ण रक्कम जमा झाल्याचे दाखविण्यासाठी त्यांनी कंपनीकडे अधिकृतरीत्या पैसे भरलेल्या ग्राहकांचे पैसे या 40 जणांनी भरल्याचे दाखविले. यामधून त्यांनी एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत तब्बल 1 कोटी 65 लाख रुपयांची अफरातफर केली आहे. 40 कारसाठी ग्राहकांनी पूर्ण रक्कम भरलेली नसतानाही वेंगुर्लेकर आणि इतरांनी त्यांना गाड्यांची विक्री केली; तसेच कंपनीच्या खात्यावर भरण्यासाठी ग्राहकांनी दिलेली रक्‍कम ही कंपनीच्या खात्यात न भरता स्वत:कडे जमा केली; मात्र डिस्काउंट वगळता उर्वरित सर्व रक्कम भरूनही आम्हाला अद्याप गाड्या मिळाल्या नाहीत, अशा तक्रारी ग्राहकांनी शोरूममध्ये केल्या. ऑडिट केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आली. त्यानंतर सेहगल यांनी फिर्याद दिली. यामध्ये आणखी काही जण सहभागी असल्याचा संशय सेहगल यांना आहे,  अशी माहिती वानवडी पोलिस ठाण्याचे  सहायक पोलिस निरीक्षक व्ही. डी. राऊत यांनी दिली.