Mon, Sep 24, 2018 18:56



होमपेज › Pune › व्हिडिओ पाहून कोल्हापुरातून चारचाकी चोरणारा गजाआड

व्हिडिओ पाहून कोल्हापुरातून चारचाकी चोरणारा गजाआड

Published On: Aug 09 2018 1:37AM | Last Updated: Aug 09 2018 1:29AM



पुणे : प्रतिनिधी 

युट्यूबवरून गाडी चोरण्याच्या व्हिडिओ पाहून कोल्हापूर येथून चारचाकी चोरणार्‍याला गुन्हे शाखेच्या गुंडा स्कॉड उत्तर विभागाच्या पथकाने अटक केली असून त्याच्याकडून एका डस्टर गाडीसह तीन चारचाकी व 5 मोबाईल जप्त केले आहेत. रेवण सोनटक्के (20, महंमदवाडी, हडपसर) असे त्याचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंडा स्कॉड उत्तर विभागाचे पोलिस निरीक्षक अंजूम बागवान व त्यांच्या पथकातील कर्मचारी बुधवारी खडकी परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासत होते.  त्यावेळी मुळा रोड येथे रस्त्याच्या कडेला संशयितरित्या डस्टर गाडी उभी असल्याचे आढळले.  गाडीत बसलेल्या व्यक्तीकडे चौकशी केल्यावर तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने त्याच्याबद्दलचा संशय अधिकच बळावला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने ही गाडी कोल्हापूर येथील गॅरेजमधून चोरली असल्याचे सांगितले. त्यानंतर अशा प्रकारे त्याने  एक इनोव्हा व स्कोडा कोल्हापूर व सांगलीतून चोरल्याचे कबूल केले. त्याच्याकडून तीन चारचाकी व 5 मोबाईल जप्त केले. ही कारवाई पोलिस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलिस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अंजुम बागवान, सहायक पोलिस निरीक्षक गणेश पवार, कर्मचारी नरेंद्र सोनवणे, भालचंद्र बोरकर व इतर कर्मचारी यांच्या पथकाने केली. 

युट्यूबवर व्हिडिओ पाहून चोरायचा गाड्या 

युट्यूबवर ‘गाडी चुराने का तरिका’ या व्हिडिओ क्‍लीप पाहून रेवण चोरी करत होता.  गाड्या गॅरेजमध्ये दिल्यानंतर  मेकॅनिक गाडीची चावी गॅरेजमध्ये किबोर्डवर ठेवत होता. त्यावेळी तेथे गाडी दुरुस्तीच्या बहाण्याने जाऊन चावी चोरायचा. त्यानंतर नंतर रात्री त्या चावीच्या मदतीने गाडी चोरून निघून जायचा. त्याने चोरलेल्या गाड्या स्वत: फिरण्यासाठी वापरल्या. तर डस्टरचा वापर त्याने हडपसर-सोलापूर वाहतुकीसाठी केला. तसेच अशाच स्कोडा गाडीचा नगर रोडवरील शिरूरजवळ अपघात झाल्याने ती सोडून दिली होती. तर त्याने यापूर्वी शिवाजीनगर व बसस्थानक परिसरात मोबाईल चोरी केली होती. त्याला यापूर्वी ऑगस्ट 2017 मध्ये मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात अटक कऱण्यात आली होती.