Sun, Aug 25, 2019 18:59होमपेज › Pune › राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील 

Published On: Apr 29 2018 12:05PM | Last Updated: Apr 29 2018 2:23PMपुणे : पुढारी ऑनलाईन

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. नवीन प्रदेशाध्यक्ष पदावर नेमकी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु होती. अखेर आज प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्‍याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला. मुख्यनिवडणुक अधिकारी दिलीप वळसे पाटील यांनी जयंत पाटील यांच्या नावाची घोषणा केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुण्यातील मोतीबाग या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. पदाधिकाऱ्यांच्या निवडीवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. यामध्ये दिलीप वळसे पाटील यांनी जयंत पाटील यांच्या नावाची घोषणा केली.

या बैठकीला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, जयंत पाटील, सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे, शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यासह आमदार, खासदार तसेच पदाधिकारी मोठ्या संख्यने उपस्थित होते.

जयंत पाटील यांचा राजकीय प्रवास

कॉंग्रेसचे जेष्ठ नेते स्व. राजारामबापू पाटील यांचे सुपुत्र

राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर १९८४ साली राजकारणात प्रवेश

सध्याच्या राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष

१९९० साली प्रथम कॉंग्रेसच्या तिकिटावर इस्लामपूरमधून विधानसभेवर विजयी

१९९९ शरद पवार यांच्या आग्रहामुळे राष्ट्रावादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश

कॉंग्रेस –राष्ट्रावादी आघाडी सरकारच्या काळामध्ये १९९९ ते २००८ अर्थमंत्री पदाचा पदभार

२००२ – २००४ दरम्यान राज्याचे आर्थिक गणित बिघडले असताना आर्थिक बाजू सावरण्यात मोठा वाटा

२६ / ११ च्या हल्ल्यानंतर स्व. आर आर पाटील यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला, त्यावेळी जयंत पाटील यांची गृहमंत्री पदी निवड. पोलीस दलात हायटेक टेक्नोलॉजीने सुसज्ज बंदुका आणल्या, फोर्स वनची स्थापना,

२००९ ते २०१२ ग्रामविकासमंत्री पदाचा पदभार

१९९० ते २०१४ सलग ६ वेळा विधानसभेवर विजयी

Tags :  NCP, jyant patil, president, sharad pawar