Sun, Aug 25, 2019 03:36होमपेज › Pune › ‘बगलबच्चे सत्तेत ठेवून आंदोलने काय कामाची’

‘बगलबच्चे सत्तेत ठेवून आंदोलने काय कामाची’

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

एका  बाजूला आपले  बगलबच्चे सत्तेत ठेवायचे आणि   दुसर्‍या बाजूला  आंदोलने करायची हे उद्धव ठाकरेंना तरी पटते का? जनतेला आता हे सारे   कळू लागले आहे, त्यामुळे त्यांनी जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते सत्तेत राहून घ्यावेत, असा सल्ला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  पत्रकारांशी बोलताना दिला.

पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीच्या वतीने  काल, रविवारी सरकारविरोधात ‘हल्लाबोल’ आंदोलन करण्यात  आले होते. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले की,  जनतेच्या प्रश्‍नांसाठी आम्ही आंदोलन करत आहोत; मात्र  तुम्ही सत्तेत आहात, तर प्रश्‍न मिटविण्यासाठी तुम्ही तसे निर्णय घ्या. तुम्ही सत्तेत आहात हे उद्धव ठाकरेंना कोणीतरी सांगा, असा टोला पवार यांनी लगावला
आज  साहित्यिक-कलाकार यांच्यात आपले स्वातंत्र्य हिरावून घेतले जात असल्याची भावना वाढत आहे. म्हणून तर ते त्यांचे पुरस्कार परत करत आहेत. 

सरकार कलबुर्गी, पानसरे व दाभोलकर यांचे मारेकरी  का शोधून काढत नाहीत. जे लोक विचार मांडतात त्यांना संपविण्याचे काम सध्या सुरू आहे, असे पवार म्हणाले. जे लोक  बदनाम होते ते अचानक कसे चांगले झाले. एवढे नगरसेवक व आमदार भाजपमध्ये कसे जात आहेत, असा सवाल करत पवार म्हणाले की, हे लोक काहींची गळचेपी करतात, तर काहींना फोडण्यासाठी कोटी-कोटी रुपये दिले जातात. 

आमदार हर्षवर्धन जाधव स्वतः म्हणतात की, मला फोडायला पाच कोटींची ‘ऑफर’ होती.  मनसेचे राज ठाकरे सांगतात की, त्यांचे नगरसेवक फोडण्यास तीस कोटी दिले. भाजपकडे एवढा पैसा आला कोठून? हे तर पारदर्शक कारभार करतात ना? भाजपच्या नेत्यांनी सांगलीच्याही एका बड्या प्रस्थाला कारवाईची भीती दाखवत भाजपमध्ये घेतले. त्यामुळे जनतेनेही याचा विचार करावा, असे आवाहन या वेळी पवार यांनी केले.

या वेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते योगेश बहल, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, माजी महापौर मंगला कदम, अपर्णा डोके, वैशाली घोडेकर, माजी उपमहापौर राजू मिसाळ, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर उपस्थित होते.