Mon, Mar 25, 2019 09:08होमपेज › Pune › पुणे : अडीचशे विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा 

पुणे : अडीचशे विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा 

Published On: Aug 28 2018 10:52PM | Last Updated: Aug 28 2018 10:52PMलोणी काळभोर  (जि. पुणे) : प्रतिनिधी

लोणी काळभोर येथील एम आय टी कॉलेजच्या मॅनेट मधील अडीचशे विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्‍याची माहिती समोर आली आहे. अंदाजे ७० ते ८० विद्यार्थी अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. परंतु, एम आय टी प्रशासन व विश्वराज रुग्णालय प्रशासनाकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे.  

लोणी काळभोर येथील एम आय टी कॉलेजच्या मॅनेट विभागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी अंदाजे अडीचशे विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येवरून समजते.

काही विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज (दि. २८ ऑगस्‍ट) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास विद्यार्थ्यांनी अल्पोपहार घेतला. यामध्ये गुलाबजामुन खाल्ले असल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले, त्यानंतर साधारण पाच वाजण्याच्या सुमारास पाच ते सहा विद्यार्थ्यांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने हे विद्यार्थी विश्वराज रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आले. त्यानंतर काही वेळाने अनेक विद्यार्थ्यांना जुलाब उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने सर्व विद्यार्थी विश्वराज रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल झाले. या सर्व विद्यार्थ्यांची संख्या अंदाजे अडीचशेच्या आसपास आहे. या पैकी अंदाजे सत्तर विद्यार्थी अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहेत. परंतु या घटनेची अधिकृत माहिती देण्यास एम आय टी कॉलेजच्या प्रशासनाने व विश्वराज रुग्णालय प्रशासनाने टाळाटाळ केली आहे. रात्री उशिरा पर्यंत रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे.