वडगाव मावळ : वार्ताहर
मावळ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने 9 ऑगस्ट रोजी तालुक्यात चार ठिकाणी ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात येणार असून या व्यतिरिक्त आंदोलनकर्त्यांनी कुठेही आंदोलन करू नये, असे आवाहन प्रांताधिकारी सुभाष भागडे, तहसीलदार रणजित देसाई व उपविभागीय पोलिस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांनी सकल मराठा समाज मोर्चाच्या कार्यकर्त्यांना केले.
9 ऑगस्ट रोजी होणार्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. 7) वडगाव मावळ येथे आयोजित संयुक्त बैठकीत ते बोलत होते. बैठकीस नायब तहसीलदार सुनंदा देसाई, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, मुख्याधिकारी वैभव आवारे, सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी, पोलिस निरीक्षक डी. एस. हाके, अमरनाथ वाघमोडे, बी. आर. पाटील, रामदास इंगवले आदी उपस्थित होते.
याप्रसंगी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी (दि.9) रोजी होणार्या आंदोलनाविषयी माहिती दिली. यामध्ये लोणावळा शहर व कार्ला परिसरातील कार्यकर्ते लोणावळा येथे ‘रेल रोको’ आंदोलन करणार असल्याचे सांगितले; तसेच, वडगाव, तळेगाव, देहूरोड या शहरांसह सोमाटणे व पवनमावळ भागातील कार्यकर्ते उर्से टोलनाका येथे रास्ता रोको करुन पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग रोखणार आहेत. आंदरमावळ, नाणेमावळ भागासह कामशेत, कान्हे परिसरातील कार्यकर्ते कान्हे फाटा येथे महामार्गावर रास्ता रोको करणार आहेत. तळेगाव स्टेशन, वराळे, आंबी, वारंगवाडी, नवलाख उंबरे, माळवाडी, इंदोरी, परिसरातील कार्यकर्ते तळेगाव स्टेशन येथे सिंडीकेट बँकेसमोरील चौकामध्ये रास्ता रोको करुन तळेगाव-चाकण मार्ग रोखून धरणार आहेत.4 ठिकाणी ‘चक्का जाम’ करून आंदोलन यशस्वी करण्याचा निर्णय मराठा मोर्चाच्या वतीने घेण्यात आला असून याव्यतिरिक्त आंदोलनकर्त्यांनी कुठेही आंदोलन करू नये, कोणीही आक्षेपार्ह वक्तव्य करु नये, असे आवाहन प्रांताधिकारी भागडे व उपविभागीय पोलिस अधिकारी शिवथरे यांनी उपस्थितांना केले.