Wed, Aug 21, 2019 19:33होमपेज › Pune › ध्वजस्तंभाची वर्कऑर्डर राष्ट्रवादीच्या काळातील

ध्वजस्तंभाची वर्कऑर्डर राष्ट्रवादीच्या काळातील

Published On: Aug 09 2018 1:37AM | Last Updated: Aug 09 2018 12:36AMपिंपरी : प्रतिनिधी

निगडीत देशातील सर्वांत उंच 107 मीटर उंचीचा राष्ट्र ध्वजस्तंभ उभारणीचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात झाला आहे. त्यांनीच या कामाची वर्कऑर्डर दिली आहे. शहरातील नागरिकांसाठी राष्ट्रचेतना जागविणारी आणि अभिमानाची बाब असल्याने सत्ताधारी भाजपने ते काम पूर्ण केले. मात्र, या कामासंदर्भात अनेक त्रुटी राहिल्याने राष्ट्रध्वज फाटत आहे. परिणामी, ध्वज काढून ठेवला आहे. त्या कामाची आणि कराराची चौकशी करून संबंधितावर कारवाई केली जाईल, असा इशारा सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिला आहे.  

वार्‍यामुळे राष्ट्रध्वज फाटत असल्याने केवळ 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि 1 मे रोजी या स्तंभावर ध्वजारोहण कार्यक्रम घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. स्तंभावर ध्वज नसल्याने आणि केवळ 3 दिवस ध्वजारोहण होणार असल्याने शहरभरातून पालिका प्रशासन व सत्ताधारी भाजपवर टीका होऊ लागली आहे. सदर कामाची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी (दि. 6) स्पष्ट केले. त्या प्रकरणी ते बोलत होते.

एकनाथ पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात या ध्वजस्तंभाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली गेली. त्यांच्या काळातच वर्कऑर्डरही दिली गेली. सुमारे साडेतीन कोटी खर्चाच्या कामांसाठी सल्लागार न नेमण्याची चूक राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. देशभरातील उंच ध्वजस्तंभाचा अभ्यास करून निगडीत स्तंभ उभारला असता, तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती. 

ध्वजस्तंभ उभारणीप्रकरणातही राष्ट्रवादी काँग्रेसकडून अक्षम्य चूक झाली आहे. हा नागरिकांच्या राष्ट्रप्रेमाशी खेळण्याचा प्रकार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे पवार यांनी स्पष्ट केले. असे असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस व विरोधक भाजपच्या नावाने शिमगा व बिनबुडाचे आरोप करीत असल्याबद्दल त्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले. आम्हाला त्यांनी राष्ट्रभक्तीचे धडे देऊ नयेत, अशीही टीका पवार यांनी विरोधकांवर केली.