Tue, Oct 22, 2019 01:39होमपेज › Pune › सई ताम्हणकरने उलगडले फिटनेसचे रहस्य

सई ताम्हणकरने उलगडले फिटनेसचे रहस्य

Published On: Feb 03 2018 7:40PM | Last Updated: Feb 03 2018 7:39PMपुणे : प्रतिनिधी

वजन कमी करणे ही माझ्यासाठी सोपी गोष्ट नव्हती. आम्हांला सतत प्रेक्षकांसमोर यायचे असते. ती आमची गरज असते. आपण काम करताना थकून जाऊ नये म्हणून वजनाकडे मी जास्त लक्ष देते. वजन कमी करण्यासाठी व्यायाम आणि जॉगिंग केले आणि वजन कमी केले, अशा शब्दात अभिनेत्री सई ताम्हणकर यांनी आपल्या फिटनेसचे रहस्य उलगडले.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने ‘सांस्कृतिक कट्टा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी अभिनेता शरद केळकर, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश काळे, सरचिटणीस दिगंबर दराडे उपस्थित होते.

सई ताम्हणकर म्हणाल्या, एखाद्या कलाकृतीबाबत आपण न बघताच प्रतिमा तयार करतो. आपण चित्रपटांकडे त्रयस्थपणे पाहायला हवे. आपण या भावनेने चित्रपट पाहिल्यास आणखी चांगल्या कलाकृती पाहायला मिळतील. वाद हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. कोणत्याही मोठ्या व्यक्तिमत्त्वावर वाद होतच आलेले आहेत. कुठल्याही गोष्टीवर आपल्या इथे वाद होतात. याचा सगळ्यांनाच मानसिक त्रास होत असतो. चित्रपट चालावेत म्हणून वाद निर्माण केले जात नाहीत.

रंगभूमीवर काम करायला आवडेल

सिनेमा, सीरियल याप्रमाणे मलाही रंगभूमीवर यायला आवडेल. पण, तशी संहिता माझ्याकडे यायला हवी. त्याप्रमाणे संहिता आल्यास रंगभूमीवरही काम करेल. अनेक भूमिका येत गेल्या, काही भूमिका आल्या वेगवेगळ्या भूमिका येत जातील. मात्र, मला एखाद्या तमाशा प्रधान आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वावर चित्रपट करायला आवडेल, असेही सई ताम्हणकरने नमूद केले.

खेळाडूची भूमिका करायला आवडेल : शरद केळकर

मी पहिल्या पासूनच खेळाच्या क्षेत्रात राहिलो आहे. त्यामुळे, एखाद्या खेळाडूची भूमिका करायला आवडेल. अभिनय तसाच राहत असतो. मात्र. त्यासाठी भाषा हे माध्यम आहे. ती बदलत राहते, असेही शरद केळकर यांनी यावेळी सांगितले.