Thu, Jul 18, 2019 20:44होमपेज › Pune › वनाज ते रामवाडी ‘मेट्रो‘ मार्गावरील पहिला खांब तयार 

वनाज ते रामवाडी ‘मेट्रो‘ मार्गावरील पहिला खांब तयार 

Published On: Mar 10 2018 2:07AM | Last Updated: Mar 10 2018 5:22PMपुणे : प्रतिनिधी 

वनाज ते रामवाडी या मेट्रोमार्गातील वनाज येथील पहिला 50 क्रमांकाचा खांब (पियर) उभा राहिला आहे. गेल्या काही दिवसांपासून या मार्गावर खांब उभारणीसाठीचे खोदकाम आणि फाउंडेशन उभारणीचे काम सुरू होते. या मार्गातील महत्त्वाचा टप्पा ठरणार्‍या पहिल्या खांबाची उभारणी झाल्यामुळे आता कामाला वेग येणार आहे. येत्या काही दिवसातच आनंदनगर येथील 49 क्रमांकाचा खांब (पियर) उभारून पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती वनाज ते रामावाडी मार्गिका क्रमांक दोनचे मुख्य प्रकल्प अधिकारी गौतम बिर्‍हाडे यांनी दिली आहे. 

वनाज येथील काम जोमाने सुरू व्हावे, यासाठी गेल्या काही दिवसांपासून या मार्गावरील वाहतूक व पार्किंग व्यवस्था बदलण्यात आलेली आहे. आतापर्यंत एकूण 20 फाउंडेशनचे काम पूर्ण झाले आहे, तर 40 ठिकाणी फाउंडेशनसाठीच्या पाया बांधणीचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे. मेट्रो बांधकामासाठी महत्त्वाचे असणारे, असे चार सेगमेंटस कास्टिंग यार्डमध्ये तयार  असून, पुढील खांबांची उभारणी पूर्ण झाल्यानंतर सेगमेंटस उभारणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. 

कर्वे नगर रस्त्यावरील मेट्रोच्या बांधकामाला अजून सुरुवात करण्यात आलेली नाही. येथील फूटपाथ रुंदीकरण, बसथांब्यांचे स्थलांतर अशी वाहतुकीशी निगडित कामे पूर्ण होत आली आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून कर्वे नगर रस्त्यावरील कामाला सुरूवात होणार आहे. त्यासाठी बदलण्यात आलेल्या चक्राकार वाहतूक व्यवस्थेला त्यावेळीच सुरुवात होण्याची चिन्हे आहेत.