होमपेज › Pune › पहिल्या टप्प्यात मेट्रो निगडीपर्यंत व्हावी

पहिल्या टप्प्यात मेट्रो निगडीपर्यंत व्हावी

Published On: Aug 17 2018 1:36AM | Last Updated: Aug 16 2018 10:53PMपिंपरी : प्रतिनिधी

पुणे मेट्रोचे काम पिंपरी-चिंचवड शहरात वेगात सुरू आहे. दापोडीच्या पुढे काम पुण्यात काम दिसत नाही. त्यामुळे पहिल्या टप्पातच निगडीपर्यंत मेट्रोची मार्गिका तयार करण्यात यावी, अशी मागणी स्थायी समिती सभेत सदस्यांनी केली. सभा नुकतीच झाली. अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. शहरातील दापोडी हॅरिस पूल ते चिंचवडच्या मदर तेरेसा पुलापर्यंत मेट्रोचे काम वेगात सुरू आहे. या मार्गात उंच उंच पिलर उभे राहिले आहेत. खराळवाडी आणि दापोडीत सेगमेंटचे स्पॅनही बसविले जात आहेत. शहरात खूपच वेगात काम सुरू आहे. 

मात्र, दापोडीच्या पुढे पुणे शहरात बोपोडी तसेच, लष्कराच्या कॅन्टोन्मेंट व अ‍ॅम्युनिशन फॅक्टरीच्या हद्दीतील खडकी व रेंजहिल्स भागात मेट्रोचे अद्याप काहीच काम दिसत नाही. लष्कराने अद्याप परवानगी दिलेली नसल्याने तेथे काम सुरू झालेले नाही. मग, पिंपरी-चिंचवड शहरात कामाची इतकी घाई का केली जात आहे. मदर तेरेसा पुल ते दापोडीपर्यंत मेट्रोचे काम करून त्याचे प्रदर्शन करणार आहात का, असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला. 

एकाच वेळी सर्व ठिकाणी काम सुरू केल्यास मेट्रोचे काम 2021 पर्यंत पूर्ण होईल. अन्यथा केवळ पिंपरी-चिंचवड शहरात पिलर दिसतील, असे शंका सदस्यांनी उपस्थित केली. शहरात काम करण्याची इतकी घाई असल्यास पहिल्या टप्प्यातच निगडीपर्यंत मेट्रोचे काम पूर्ण करावे, अशी आग्रही मागणी सदस्यांनी केली. सदस्यांनी उपस्थित केलेल्या शंका व प्रश्‍नांना सहशहर अभियंता राजन पाटील यांनी उत्तरे दिली. मात्र, त्यामुळे सदस्यांचे समाधान झाले नाही. सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.

मेट्रोचे काम आता चिंचवडच्या मदर तेरेसा पुलापर्यंत आले असून, निगडीच्या भक्ती-शक्‍ती समूह शिल्प चौकापर्यंत केवळ 4 किलोमीटर अंतर शिल्लक आहे. त्यामुळे निगडीपर्यंत मेट्रोचे काम करावे, अशी आग्रही मागणी सदस्यांनी केली. तसेच, मदर तेरेसा पूल ते खराळवाडीपर्यंतच्या सर्व्हिस रस्त्यावरील मेट्रो कामामुळे वाहतुकीस अडथळा होत असून, त्यासंदर्भात उपाययोजना करण्याचा सूचना करण्यात आल्या.