Wed, May 22, 2019 22:39होमपेज › Pune › संतांनी अध्यात्मिक लोकशाही निर्माण केली- डॉ. तारा भवाळकर

संतांनी अध्यात्मिक लोकशाही निर्माण केली- डॉ. तारा भवाळकर

Published On: Apr 13 2018 9:51PM | Last Updated: Apr 13 2018 9:51PMपुणेः प्रतिनिधी  

विज्ञानाने कितीही प्रगती केली, तरी आपल्याला संत साहित्याची ओढ लागते कारण संत साहित्यामध्ये निर्मितीचा गाभा आहे. संत साहित्य हे आपल्या गुणसूत्रांशी एकरूप झाले आहे. संत आणि संत साहित्य म्हणजे टाळकुटेपणा नसून त्याचे मूल्यमापन खोलवर रूजले आहे, ते प्रवाही आहे. संतांना त्यांच्या कर्मामुळे लोकांनीच संतपद बहाल केले आहे. संतांनी अध्यात्मिक लोकशाही निर्माण करून सर्वसामान्यांना अध्यात्माची वाट मोकळी करून दिली, अशी भावना लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासिका, लेखिका आणि आळंदी येथे आयोजित पहिल्या पसायदान विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केली. 

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्यावतीने आळंदी येथे आयोजित पहिल्या पसायदान विचार साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन आज ज्येष्ठ कवी आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

या तीन दिवशीय संमेलनाच्या उद्‌घाटन प्रसंगी व्यासपीठावर श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदीचे विश्वस्त आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे कार्यवाह प्रकाश पायगुडे, सुनीताराजे पवार, माजी नगराध्यक्ष सुरेश वडगावकर, माजी नगराध्यक्ष बबन कुराडे पाटील, विश्वस्त योगेश देसाई, पालखी सोहळा प्रमुख अॅड. विकास ढगे पाटील , विश्वस्त डॉ. अजीत कुलकर्णी,  ह.भ.प. शांतीब्रम्ह मारूती महाराज कुऱ्हेकर आदी मान्यवर उपस्थित होते.  

यावेळी बोलताना डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या की, सर्व विश्व द्वंद्वरहित आहे हेच खरे असले तरी परंपरेचा पगडा इतका जबरदस्त असतो की वेद अन्‌ वर्णाश्रमधर्म एकदम झुगारले जातच नाहीत. त्यांचे वैयर्थ एकीकडे कळत असते तरी त्यांच्या बेड्या प्रत्यक्षात तोडणे शक्य नसते. अशा वेळी निदान मानसिक पातळीवर ‘मुक्ती’चे समाधान शोधण्याचा प्रयत्न होतो. संतांनी तेच केले. मध्ययुगीन जीवनातील भौतिक वातावरण ही संतांची मर्यादा ठरली हे मान्य करूनसुद्धा त्यांनी ‘मुक्ती’चा पहिला कंठस्वर जिवाच्या आकांताने उमटवला, हे त्यांचे श्रेय त्यांना दिलेच पाहिजे.परमश्रेयाकडे जाण्यासाठी ‘विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकटले ।’ असे उद्‌गार काढून ‘विश्वस्वधर्म सूर्ये पाहो ।’ म्हणून पसायदान मागणाऱ्या ज्ञानदेवांच्या दिव्य प्रतिभेपुढे मी नतमस्तक होते. 

संतांच्या बाबत स्त्री-पुरुष असा भेद अध्यात्ममार्गात शिल्लक राहत नाही. नव्हे तो तसा मुळातच नसतो अशी संतांची भूमिका असते. लिंगभाव संपतो. व्यावहारिक पातळीवर मात्र स्त्री-पुरुष हे द्वंद्व सतत प्रश्नचिन्हे निर्माण करीत राहते. झुगारल्याखेरीज अंतिममुक्तीचा मार्ग खुला होत नाही. ज्ञात-अज्ञात भयापासून मुक्ती मिळत नाही. प्रकृतिमोहातून बाहेर येणे म्हणजे ‘नवरा सोडणे’ या परिभाषेचा आता उलगडा होईल. एकदा पुरुष-नवरा सोडायचाच म्हटल्यावर मग ‘पर-पुरुष’ तरी कशाला हवा?  एकतर मानवी पुरुष-पती ही ‘प्रकृती’च आहे म्हणून तो ‘पूर्ण पुरुष’ नव्हे. ही प्रकृती बंधक आहे. उलट पर(म)पुरुष पूर्ण पुरुष आहे. पुरुषत्वाने सर्व सुख देण्यासाठी तो समर्थ आहे आणि लग्नच न झाल्याने इतर नाती अन्‌ प्रपंच यांची कटकट नाही. बंधन नाही ही मांडणीही पुन्हा दोन पातळयांवर अर्थ व्यक्त करते.

लौकिक जीवनात विवाहसंस्थेने आणि नवऱ्याने स्त्रीच्या पायात सगळयात भक्कम बेडी अडकवली आहे, हे वास्तव सत्यच त्यातून व्यक्त होते. ती बेडी तोडणे म्हणजे स्वैरिणीचा शिक्का मारून घेण्याचे धाडस करणे होय अन्‌ प्रपंचातून मुक्ती हवी असेल तर स्वैरिणी होण्याची तयारी ठेवायला हवी हेच संत सांगतात.

विश्वातील द्वंद्व परमार्थक्षेत्रात मांडण्याची विशिष्ट परिभाषा आहे. त्यातील ‘पुरुष’ आणि ‘प्रकृतीची’ परिभाषा सर्वज्ञात अशी परिभाषा आहे. अव्यक्त चैतन्यतत्त्व किंवा आत्मतत्त्व म्हणजे पुरुष आणि पंचमहाभूतांनी सिद्ध झालेली व्यक्त सृष्टी म्हणजे ‘प्रकृती’ होय. मानवी नर-नारी म्हणजे अनुक्रमे पुरुष व प्रकृती आहेत, ही भूमिका तत्त्वज्ञानाची भूमिका नाही. मानवी नर म्हणजे पुरुष व मादी अथवा नारी म्हणजे प्रकृती हे म्हणणे म्हणजे पारमार्थिक संकल्पनांविषयीचे अज्ञान आहे. पंचमहाभूतघटित नाशवंत व व्यक्त अशी सर्व सृष्टी म्हणजे ‘प्रकृती’ असल्याने सर्व देह प्रकृतीच होय. 

स्त्री  किती  मोठ्या संतपदाला पोहचू शकते, याचे उत्तर म्हणजे संत बहिणाबार्इंची चरित्रानुभवगाथा आहे. त्यांचा हा सगळा अंतर्बाह्य संघर्ष संत तुकोबारायांच्या संघर्षाशी खूप जवळचे नाते सांगतो. म्हणून तर संत तुकोबारायांनाच गुरू करावा, अशी ओढ तिला लागली नसेल ना! आणि प्रपंचाचा अडथळा उभा करणाऱ्या स्त्री-पुत्रादिकांना ‘रांडा-पोरे’ म्हणणारे तुकोबारायचही त्याचिये जातीच्या’ वैराग्य मार्गावरच्या स्त्रिया भेटल्यावर स्त्री-पुरुष ही जाती विसरून एकच भगवत्‌भक्ताची जाती जाणत नसतील ना, असेही वाटते. देहातीत अनुभवाकडे जाण्यासाठी सर्व संतांनी ‘स्वैरिणी’ होणे खुशीने स्वीकारले आहे. परमेश्वराला पती, प्रियकर, परपुरुष म्हणवून घेणे संत स्त्रियांना भूषणाचे वाटते. त्याचप्रमाणे गुरूचीही महती वाटते. गुरूही ईश्वररूपच। त्याच्या संगतीमुळे जरी जनापवाद आले तरी त्याची पर्वा संत स्त्रिया करीत नाहीत.

यावेळी बोलताना संमेलनाचे उद्घाटक ज्येष्ठ कवी आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. वसंत आबाजी डहाके म्हणाले की, काळ बदलतो तशी काळानुसार स्थितीगती बदलते. पर्यावरण-वातावरण बदलते. लिहित्या माणसाला काळाचे हे बदलते पर्यावरण व्यवस्थित दिसते. त्यातले चढ-उतार वाचता येतात. पचवता येतात. आजचा काळ तर मोठा बिकट आहे, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय भ्रम आपल्या समोर उभे केले जात आहेत. या भ्रमातून बाहेर काढण्याचे काम लेखक, कवी, विचारवंत आणि सर्जनशील कलाकारांना करायचे आहे, हे काम करताना आपल्या पाठीशी काळाचे चढ-उतार पचवून मनाची शांती ज्यांनी बिघडवू दिली नाही अशा श्री ज्ञानदेवरायांसारखा भक्कम वारसा आहे, हे कायम लक्षात ठेवावे. 

अलीकडच्या काळातील वृत्तपत्रांतील अनेक छायाचित्रे आठवतात. कुणा तरुणाने आत्महत्या केलेली असते, तर कुणाची हत्या झालेली असते. ते राष्ट्रीय महाकाव्यातील वीरनायक नसतात, ते राष्ट्राच्या वर्तमानातील सामान्य इसम असतात. आर्थिक कोंडीमुळे आत्महत्या केलेले, धार्मिक विद्वेषामुळे हत्या झालेले सामान्य लोक. पण त्यांच्या चैतन्यहीन देहांच्या शेजारी बसलेल्या असहाय्य मातांचा मूक आक्रोश सामान्य नसतो. मग माणसाने घाबरणे, घाबरत राहणे, भयभीत होणे आणि थरथरत राहणे हेच आहे का आपल्या काळाचे निदान? कवींनी, लेखकांनी, विचारवंतांनी, चित्रकारांनी, चित्रपटकारांनी थरथरत राहावे ? मग कविता, कथा, कादंबरी, नाटक, चित्र, चित्रपट कुणाला काय देत असते ? हे सगळे लिहिणारे, चितारणारे विश्वाच्या अक्राळविक्राळ रूपाचे दर्शन घडवत असतात.

परंतु आता हे लेखकदेखील थिटे पडतील असे काही विचित्र घडते आहे. आम्हीच असे आहोत की अजगराच्या विळख्याचे सुख अनुभवत आहोत, आणि त्याची उघडउघड प्रशंसा करीत आहोत. हा आजचा अजगर राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक आहे हे समजत असले तरी भ्रमात राहू इच्छितो, त्याच्या फुंकरीने आम्हाला आंधळे केले आहे, आमच्यात विचारमांद्य उत्पन्न केले आहे हे आम्हाला समजत नाही. म्हणून पसायदान विचार साहित्य संमेलन. बाजारी उपभोगवादी व असहिष्णु बनत चाललेल्या समाजाला सहजीवनाचे, सहअस्तित्वाचे मर्म समजून सांगण्यासाठी. हे काम ज्ञानदेवासारखा कवीच करू शकतो. आपल्या मागे आपला बाप ज्ञानेश्वर उभा आहे. त्याचे पसायदान हा आमचा महत्तम वारसा आहे. 

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदीचे विश्वस्त आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी संमेलन आयोजित करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की,  ज्ञानेश्‍वर माऊलींनी ‘वसुधैव कुटुंबकम’ अशा विचारांनी विश्‍वात्मक देवाकडे जगाच्या कल्याणासाठी धर्म, जात, पंथ या मर्यादा ओलांडत पसायदान मागितले आहे. त्यामुळे ही एक सर्वश्रेष्ठ प्रार्थना आहे आणि ती प्रत्येक धर्माला आपली वाटू शकते. समाजाचा विध्वंस करणारी मनातली तामसी वृत्ती नष्ट होऊन मानव प्राण्यात बंधुभाव, प्रेम व स्नेह निर्माण व्हावा व त्याने आपल्या बुध्दी कुवतीप्रमाणे सत्कार्य करावे, हा पसायदानाचा विचार एकूणच वारकरी संप्रदायाचा पाया आहे.

विश्‍वशांतीसाठी पसायदान हे रचलेले महान असे शांतीसुक्त आहे. ‘संतांनी जनतेच्या कळवळ्याने लिहिले म्हणून ते जनतेत जाऊन बसले. मराठीत राष्ट्रीय ग्रंथ कोणते असा प्रश्‍न केला तर ज्ञानेश्‍वरी, नाथांचे व तुकोबांचे अभंग, मनाचे श्‍लोक, मुक्ताबाई, जनाबाईचे अभंग, श्रीधर व महीपती यांचे ग्रंथ असे उत्तर दिले पाहिजे. जे ग्रंथ गावोगाव आहेत, रोज वाचले जातात तेच खरे राष्ट्रीय ग्रंथ. जनतेच्या जीवनात जे ग्रंथ अजून ओलावा निर्मित आहेत तेच खरे थोर ग्रंथ! 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी म्हणाले की, पसायदान ही जशी श्रेष्ठ विश्वात्मक प्रार्थना आहे तसेच मानव्याच्या प्रतिष्ठापनेला आवाहन करणारे ते श्रेष्ठ मूल्य आहे. आज जगण्यातील कस हरवत चालला आहेजीवनाची गुणवत्ता ढासळत चालली आहे.सामाजिक वातावरण कलुषित झाले आहे अशा कसोटीच्या काळात पसायदान विचार साहित्य सम्मेलन विवेकी विचारांचा जागर करेल. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रकाश पायगुडे यांनी केले.