Sat, Jul 20, 2019 02:52होमपेज › Pune › ससून रुग्णालयात पहिले यकृत प्रत्यारोपण

सरकारी रुग्णालयातील राज्यात पहिलेच यकृत प्रत्यारोपण

Published On: Sep 03 2018 8:36PM | Last Updated: Sep 03 2018 8:36PM पुणे : प्रतिनिधी

ससून रुग्णालयात 22 ऑगस्ट ला पहिलीच यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ही शस्त्रक्रिया साता-यातील 58 वर्षीय निवृत्त शिक्षकावर करण्यात आली असून आता त्यांनी त्यांची तब्येतही सूधारत आहे. त्यांना ब्रेन डेड रुग्णाच्या यकृताचे प्रत्यारोपण करण्यात आले आहे. अशा प्रकारे राज्यातील 17 शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाशी संलग्नित रुग्णालयात यकृत प्रत्यारोपण करुन यशस्वी करणारे पहिलेच रुग्णालय ठरल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी दिली. 

गेल्या महिन्यात 22 ऑगस्ट रोजी सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात 37 वर्षीय तरूण ब्रेन डेड झाला होता. त्यावेळी त्याचे अनेक अवयव दान करण्यात आले होते. त्यापैकी त्याचे यकृत ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून ससून रुग्णालयातील या 58 वर्षीय रुग्णावर प्रत्यारोपित करण्यात आले. त्यामुळे आता रुग्णालय सूरू करण्यात आल्यापासून दीड शतकानंतर पहिल्या यकृत प्रत्यारोपणाने ससून रुग्णालयाने सामान्य माणसांसाठी एक ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. यकृत प्रत्यारोपणासारखी महागडी सुविधा सामान्य माणसाच्या आवाक्यात आणून राज्यामध्ये या रुग्णालयाने इतिहास घडविला आहे. या रूपाने ही शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षीची भेटच असल्याचे डॉ. चंदनवाले यांनी सांगितले.

प्रत्यारोपण झालेला 58 वर्षीय रुग्णाला पत्नी, मुलगा व सून असून एक मुलगी विवाहित आहे . हा रुग्ण गेल्या तीन वर्षांपासून यकृताच्या दुर्धर आजाराने त्रस्त होता. त्याचे नाव झेडटीसीसी अंतर्गत ससून रुग्णालयात नोंदविण्यात आले होते. त्यांना खाजगी रुग्णालयात 22 लाख रुपयांचा प्रत्यारोपणाचा खर्च सांगितला होता. पण तो परवडत नसल्यामुळे ससून  रुग्णालयातून यकृतप्रत्यारोपण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. येथे त्यांना केवळ औषधांसाठी आठ लाख रुपये खर्च आला आहे. इतर सर्व खर्च रुग्णालयाने मोफत केला आहे. 

यावेळी बोलताना अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले म्हणाले की, गेल्या वर्षात 9 किडनी प्रत्यारोपण व एक यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. ससून रुग्णालयाच्या रुग्णसेवेचा दर्जा उंचावल्यामुळे या आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वी होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने सुरु झालेल्या अवयवदानाच्या चळवळीमुळे रुग्णांच्या नातेवाईकांचाअवयवदानासाठी  सकारात्मक प्रतिसाद दिसून येत आहे.

सोलापूरच्या खाजगी रुग्णालयातील ब्रेन डेड रुग्णाचे यकृत डॉ. कमलेश बोकील,  डॉ. संतोष थोरात व परिचारिका धारणा जगताप हे पथक गेले होते. तर प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या पथकात डॉ. शितल धडफळे, डॉ. शशिकला सांगळे, डॉ. वंदना दुबे, डॉ. किरण जाधव, डॉ. अजय तावरे, भूल तज्ञ डॉ. विद्या केळकर, डॉ. सुरेखा शिंदे, डॉ. योगेश गवळी, डॉ. हरीश टाटिया या डॉक्टरांचा सहभाग होता. अधिसेविका राजश्री कोरके , परिचारिका स्वाती डोईफोडे, तारिका राऊत, अनिता धिंडहाळ, सुनीता अहिरे तसेच अर्जुन राठोड व संदीप खरात यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 
       
 पाच जणांनी केली नोंदणी

रुग्णालयात यकृत प्रत्यारोपण होत असल्यामुळे आता तेथे आणखी पाच रुग्णांनी प्रत्यारोपणासाठी नोंद केली आहे. केवळ ब्रेन डेड रुग्णाचे नव्हे तर जीवंत दाता असलेलेही प्रत्यारोपण आता तेथे होणार आहे. तर किडणी प्रत्यारोपणासाठी 17 रुग्णांनी नोंद केली आहे.
 
लवकरच ह्रदय प्रत्यारोपणदेखील

ससून रुग्णालयात लवकरच ह्रदय प्रत्यारोपणही होणार आहे. कारण, रुग्णालयाने तसा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागाकडे पाठवला आहे. त्याअनुषंगाने तेथे पाहणी देखील झाली असून आता लवकरच परवानगी मिळेल, अशी माहिती डॉ. चंदनवाले यांनी दिली.