Thu, Sep 20, 2018 12:47



होमपेज › Pune › पुणे : वेळीच जाग आली नि वाचला जीव..

पुणे : वेळीच जाग आली नि वाचला जीव..

Published On: Jul 12 2018 12:24PM | Last Updated: Jul 12 2018 12:24PM



पुणे : प्रतिनिधी

कोंढवा कात्रज रस्त्यावर बौद्ध विहार अपार्टमेंटमध्ये आज, गुरुवारी सकाळी एका घरामधे भीषण आग लागली. घरात असलेल्या मुलाची सावधगिरी व अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग विझवल्याने धोका टळला. आगीची घटना लक्षात येताच पंधरा वर्षीय ऋषिकेश मोरे या मुलाने अग्‍निशमन विभागाला कळविले तसेच तिथेच राहणार्‍या जवान गणपत पडये यांची मदत मोलाची ठरली. 

ऋषिकेश याच्याकडून बौद्ध विहार अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर आग लागल्याची माहिती मिळताच अग्‍निशमन विभागाने त्‍वरीत दखल घेतली. दलाकडून लगेच कोंढवा(खुर्द) अग्निशमन वाहन व देवदूत क्विक रिस्पॉन्स टीम घटनास्थळी दाखल झाली. पहिल्या मजल्यावर असणाऱ्या घरामधे दुरचित्रवाणी संच, कपाट, वायरिंग व इतर घरगुती वापराच्या साहित्याने पेट घेतला होता. जवानांनी ताबडतोब घरामधे पाण्याचा मारा करत दहा मिनिटात आग पूर्णपणे विझवली. तसेच आतमधे कोणी अडकले अथवा जखमी नसल्याची खात्री केली. 

घरात भाडेकरु असलेला मुलगा ऋषिकेश मोरे (वय १५) याने सांगितले की, मी झोपलो असताना अचानक काहीतरी जळत असल्याचा वास आल्याने मी जागा झालो. तर घरातील वीज गेली असून काही वस्तू जळाल्याचे दिसले. म्हणून तातडीने अग्निशमन दलास माहिती कळविली व जवानांनी कामगिरी चोख बजावली. मला जाग आली नसती तर काहीतरी विपरित घडले असते अशी भावना ऋषिकेशने व्यक्त केली.

सदर कामगिरी मधे कोंढवा अग्निशमन केंद्राचे तांडेल सुभाष जाधव, गणपत पडये,  चालक - सुखदेव गोगावले, जवान संग्राम देशमुख, विशाल यादव आणि देवदूत क्विक रिस्पॉन्स टिमचे अंबादास घनवट, प्रदिप कोकरे, अविनाश लांडे सहभागी होते.