Tue, May 26, 2020 17:45होमपेज › Pune › आग आणि स्फोटाने कुरकुंभ पुन्हा हादरले

आग आणि स्फोटाने कुरकुंभ पुन्हा हादरले

Published On: Aug 15 2019 9:55AM | Last Updated: Aug 15 2019 9:55AM

अल्कली आमाईन्स कंपनीत लागलेली भीषण आग.कुरकुंभ (जि. पुणे) : वार्ताहर 

कुरकुंभ (ता.दौंड) औद्योगिक क्षेत्रातील अल्कली अमाईन्स या केमिकल कंपनीमध्ये अचानक भीषण आग लागली. आग व स्फोटांने कुरकुंभसह परिसर पुन्हा हादरून गेला. आगीची तीव्रता भयानक असल्यामुळे कुरकुंभ पासून आसपासच्या १० ते १५ किलोमीटरपर्यंत आगीचे व धुराचे लोट पसरले. 

एकापाठोपाठ केमिकल बॅलरचे स्फोट होत असल्याने नागरिक भयभीत होऊन सैरावैरा पळत सुटले होते. तीन तासांच्या अथक प्रयत्ननंतर आग आटोक्यात आणण्यास अग्निशमन दलाला यश आले. सुदैवाने या घटनेत कोणती जीवितहानी झाली नाही. मात्र, उलटसुलट चर्चेला उत आला होता. अल्कली अमाईन्स कंपनीतील स्टॉक यार्डात बुधवार (दि.१४) रात्री १० च्या सुमारास भीषण आग लागली होती. कंपनीत मोठ्या प्रमाणात रासायनिक (केमिकल) साठा होता. घटनास्थळी शेजारी हायड्रोजन प्लँट होता. सुदैवाने आग आटोक्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली. 

कंपनीत रासायनिक बॅलरचे मोठ्या प्रमाणात स्फोट होत होते. परिणामी अग्निशमन दलाला आगीपर्यंत पोहोचवण्यास अडचणी येत होत्या. आगीची तीव्रता भयानक असल्याने शेजारील कंपनीला देखील झळ बसण्याची शक्यता निर्माण झाली होती. बॅलरच्या एकापाठोपाठ एक भयानक स्फोटांचा आवाज व आगीमुळे कुरकुंभ, पांढरेवाडी, मुकादमवाडी, झगडेवाडी, जिरेगाव, मळद, यासह १० ते १५ किलोमीटर अंतरावरील वाड्यावस्त्या रिकाम्या करून नागरिक निघून गेले होते. आगीच्या घटनेनंतर रात्री जाब विचारण्यासाठी नागरिकांनी कंपनीच्या गेटसमोर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. सुरक्षिततेचा अभावी वारंवार आग व स्फोटाच्या घटना घडत असल्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत कंपनी बंद करण्याची मागणी करण्यात आली.