Wed, Apr 24, 2019 21:28होमपेज › Pune › सात नगरसेवकांचे भवितव्य टांगणीला

सात नगरसेवकांचे भवितव्य टांगणीला

Published On: Aug 25 2018 1:16AM | Last Updated: Aug 25 2018 12:50AMपुणे : प्रतिनिधी

महापालिकेतील सात नगरसेवकांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. त्यात सत्ताधारी भाजपच्या पाच नगरसेवकांसह विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांचा आहे. यामधील जवळपास पाच नगरसेवकांनी सहा महिन्यांच्या मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेले नसून दोन नगरसेवकांच्या जातवैधता प्रमाणपत्राबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

भाजप नगरसेवकांमध्ये किरण जठार, फरझाना शेख, आरती कोंढरे, कविता वैरागे, वर्षा साठे तर राष्ट्रवादीचे बाळाभाऊ धनकवडे व रुक्साना इनामदार या सात नगरसेवकांचा समावेश आहे. पालिका निवडणुकीनंतर सहा महिन्यांच्या मुदतीत आरक्षित प्रभागातून निवडून आलेल्या नगरसेवकांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. यासंदर्भात एका याचिकावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने कोल्हापूर महापालिकेच्या वीस नगरसेवकांचे पद रद्द ठरविले आहे. न्यायालयाचा हा निकाल आता अन्य महापालिकांनाही लागू होणार आहे. त्याचा फटका आता पुणे महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधीपक्षाच्या नगरसेवकांनाही बसणार असल्याचे समोर आले आहे. महापालिकेचे निवडणूक निर्णय अधिकारी संतोष भोर यांनी शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न करणार्‍या नगरसेवकांची संख्या 7 इतकी आहे. त्यामधील रुक्साना इनामदार आणि किरण जठार यांच्या जातवैधता प्रमाणपत्राबाबत न्यायालयात वाद सुरू आहेत. तर उर्वरित सदस्यांनी सादर केलेले जातवैधता सहा महिन्यांच्या मदतीनंतर सादर केले असल्याचे भोर यांनी सांगितले. या सदस्यांची माहिती राज्य शासनाला कळविण्यात आली असून त्यावर आता शासनाच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.