Fri, May 24, 2019 02:36होमपेज › Pune › विविध मागण्यांसाठी शेतकर्‍यांचे 14 मे रोजी जेलभरो

विविध मागण्यांसाठी शेतकर्‍यांचे 14 मे रोजी जेलभरो

Published On: Apr 28 2018 1:45AM | Last Updated: Apr 28 2018 1:32AMपुणे : प्रतिनिधी

राज्यातील शेतकर्‍यांना सरसकट कर्ज व वीजबिल मुक्ती मिळाली पाहिजे, स्वामीनाथन समितीच्या शिफारशीनुसार उत्पादन खर्चावर पन्नास टक्के नफा मिळावा, सर्व शेतमालावरील निर्यात बंदी उठवून शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याची शेतकरी सुकाणू समितीची मागणी आहे. या मागण्यांकडे केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 14 मे रोजी राज्यात लाखो शेतकरी जेलभरो आंदोलन करणार असल्याची घोषणा सुकाणू समितीचे नेते आणि शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी येथे केली.

सांगली येथून शहीद दिनापासून म्हणजे 23 मार्चपासून सुकाणू समितीच्या पुढाकाराने शहीद अभिवादन शेतकरी जागृती यात्रेस सुरुवात झाली आहे. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात जाऊन शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करणण्यात आली. सतत 40 दिवस 11 हजार 300 किलोमीटरचा प्रवास करून, राज्यभरातील हुतात्म्यांच्या स्मारक स्थळांना भेटी देत ही यात्रा शुक्रवारी (दि. 27) पुण्यात आली. श्रमिक कामगार भवन ते महात्मा फुले वाड्यापर्यंत शेतकर्‍यांनी रॅली काढली. यावेळी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करुन झालेल्या सांगता सभेत पाटील यांनी ही घोषणा केली. तत्पुर्वी त्यांच्या हस्ते राजेंद्र सोनवणे लिखित शेतकर्‍यांचा कट्टरवाद या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी कालिदास आपेट, शिवाजी नांदखिले, नवनाथ पटारे, ब्रिगेडियर (निवृत्त) सुधीर सावंत, सुभाष लोमटे, धनंजय शिंदे, सुभाष काकुस्ते आदींची भाषणे झाली. राज्यभरातील विविध जिल्ह्यातील शेतकरी यावेळी उपस्थित होते.

रघनाथदादा म्हणाले, राज्य सरकारची दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफीची घोषणा ही अटी व शर्तीमध्ये अडकून शेतकर्‍यांची फसवणूक झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकरी शिष्टमंडळाशी बोलायला वेळ नाही. राज्यात शेतकर्‍यांच्या होणार्‍या आत्महत्या हा कलंक असून, त्याची सरकारला लाज वाटत नाही.  शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सरकारचे कंबरडे मोडण्याची वेळ आल्याची टीका पाटील यांनी यावेळी केली. राज्यभरातून सुमारे पाच लाख शेतकरी जेलभरो आंदोलनात सहभागी होणार असल्याचेही त्यांनी जाहिर केले.