Wed, Aug 21, 2019 15:24होमपेज › Pune › शेतकरी संपाने महागाईचा भडका

शेतकरी संपाने महागाईचा भडका

Published On: Jun 04 2018 1:30AM | Last Updated: Jun 04 2018 1:17AMपुणे : प्रतिनिधी

जिल्हाभरातील संपकरी शेतकर्‍यांनी निर्धाराने शहराला मालपुरवठा बंद केल्याने महागाईचा भडका उडण्याची चिन्हे दिसत आहेत. बाजारात शेतमालाची आवक घटल्याने घाऊक बाजारात फळभाज्यांसह सर्व प्रकारच्या पालेभाज्यांच्या भावात सुमारे 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. परिणामी, किरकोळ बाजारातही भाज्यांचे भाव कडाडले आहेत. दरम्यान, शेतकर्‍यांचा संप असाच सुरू राहिल्यास भाज्यांचे भाव अजून वाढण्याची शक्यता व्यापार्‍यांकडून वर्तविण्यात येत आहे. 

सात जूनपासून रस्त्यावरची लढाई 

कर्जमाफी, शेतमालास हमीभाव आणि दुधाच्या प्रश्‍नासाठी गेल्या तीन दिवसांपासून शेतकरी संघटनांचा अराजकीय व शांततापूर्ण मार्गाने संप सुरू आहे. तरीही सरकार शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर अजून गंभीर दिसत नसल्याचा आरोप करीत राष्ट्रीय किसान महासंघाने सरकारला 7 जूनपर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर रस्त्यावर लढाई सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे. समन्वय समितीचे सदस्य संदीप गिड्डे, ज्येष्ठ शेतकरी नेते श्रीकांत तराळ (अमरावती), लक्ष्मण वंगे (लातूर) तसेच शंकर दरेकर यांनी पत्रकार परिषदेत हा इशारा दिला. शेतकर्‍यांचा खरोखरच कळवळा असेल राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणेच भाजप व काँग्रेसनेही शेतकरी संपास पाठिंबा जाहीर करावा, असे आवाहन किसान सभेने केले. 

मध्यप्रदेशातील मंदसौर येथे आयोजित शेतकरी श्रद्धांजली सभेच्या मुहूर्तावर राहुल गांधी यांची सभा आयोजित करून काँग्रेस राजकारण करीत असल्याचा आरोप करण्यात आला. शेतकर्‍यांच्या संपाविरुद्ध हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा राष्ट्रीय किसान महासंघाने निषेध केला आहे. त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नसून त्यांनी शेतकर्‍यांचा अपमान केल्याने राजीनामा देण्याची मागणीही सभेने केली.

पुण्यात फक्त 850 गाड्यांची आवक

शेतकरी संपाच्या पहिल्या दिवशी, शुक्रवारी, 1 जून रोजी शहरात कोणताच परिणाम जाणवला नव्हता. दुसर्‍या दिवशी, शनिवारी मार्केट यार्डमधील घाऊक भाजीपाला बाजार साप्ताहिक सुट्टीमुळे बंद होता. त्यानंतर,  गेल्या आठवड्याच्या सरासरी सुमारे 1350 गाड्यांच्या तुलनेत, संपाच्या तिसर्‍या दिवशी, रविवारी, बाजारात फक्त 850 गाड्यांची म्हणजे केवळ 75 टक्के आवक झाल्याची माहिती बाजार समितीचे मुख्य प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली. 

संपात सहभागी संघटना 

बळीराजा शेतकरी संंघटना, किसान सभा, ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांची भूमाता संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. 10 जून रोजी ‘भारत बंद’ची हक देण्यात आली आहे. 125 शहरात भाज्यांची टंचाई निर्माण झाल्याने शहरांना शेतीमालाचा पुरवठा खंडित करण्यात शेतकरी यशस्वी झाल्याचा दावा करण्यात आला. शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनी समन्वयाने, सर्व संघटनांशी चर्चा करुनच सरकारला प्रश्‍नत सोडविण्यासाठी 7 जूनपुर्वीचा अल्टिमेटम दिल्याचे किसान सभा नेत्यांनी सांगितले.