होमपेज › Pune › राज्यात एफआरपीचे दोन हजार कोटी थकीत

राज्यात एफआरपीचे दोन हजार कोटी थकीत

Published On: Apr 29 2018 2:41AM | Last Updated: Apr 29 2018 2:08AMपुणे ः प्रतिनिधी

राज्यात मार्च महिनाअखेर गाळप झालेल्या उसाची 15 एप्रिलअखेरच्या अहवालानुसार 2 हजार 277 कोटी रुपये एफआरपीची रक्कम देणे बाकी राहिलेले आहे. तर शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर 187 कारखान्यांनी 18 हजार 120 कोटी रुपये जमा केलेले असल्याची माहिती साखर आयुक्तालयातील ताज्या अहवालावरुन स्पष्ट झाले आहे. 

ऊस गाळप अहवालानुसार 15 एप्रिलअखेर एफआरपीच्या देय रकमेचा आकडा 20 हजार 88 कोटी रुपये होता. काही कारखान्यांनी एफआरपीच्या रकमेपेक्षा अधिक रक्कम शेतकर्‍यांना दिलेली आहे. शंभर टक्के एफआरपीची रक्कम 47 साखर कारखान्यांनी दिलेली आहे. तर 75 टक्क्यांपेक्षा कमी रक्कम देणारे 40 साखर कारखाने असल्याची माहिती साखर आयुक्तालयातील सूत्रांनी दिली. 

राज्यातील ऊस गाळप हंगाम आता अंतिम टप्प्याकडे झुकलेला आहे. साखर आयुक्तालयाने उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत तथा एफआरपीची रक्कम देण्यासाठी कारखान्यांवर कारवाई बडगा उगारला आहे. आत्तापर्यंत हंगाम 2017-18 या चालू ऊस गाळप हंगामात एफआरपीची रक्कम थकित ठेवल्याप्रकरणी एकूण 10 साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई साखर आयुक्तालयाने केलेली आहे. 

राज्यात चालूवर्षीच्या हंगामात एकूण 187 साखर कारखान्यांनी ऊस गाळप हंगाम घेतलेला आहे. साखर आयुक्तालयाकडून एफआरपीची रक्कम थकित ठेवल्याप्रकरणी यापुढे कारवाईचा धडाका कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

शेतकर्‍यांच्या उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत तथा एफआरपीची काही कारखान्यांना केवळ 25 ते 30 टक्केच रक्कम दिलेली आहे. उर्वरित 70 ते 75 टक्के रक्कम दिलेली नसल्याचे वेळोवेळी घेण्यात आलेल्या सुनावण्यांमध्ये स्पष्ट झाले आहे. संबंधित कारखान्यांनी सुनावणीत कबूल केल्याप्रमाणे रक्कम देणे अपेक्षित आहे. ती रक्कम न दिल्यास आवश्यतेप्रमाणे शेतकर्‍यांची रक्कम देण्यासाठी योग्य ती कारवाई संबंधित कारखान्यावर केली जाईल.
- संभाजी कडू पाटील, साखर आयुक्त