Wed, Mar 27, 2019 06:01होमपेज › Pune › पुण्यात शेतीमालाची आवक घटली, दरात 20 टक्कयांनी वाढ

पुणे : शेतमालाची आवक घटली; दर कडाडले

Published On: Jun 03 2018 9:09AM | Last Updated: Jun 03 2018 9:09AMपुणे : प्रतिनिधी

शेतकर्‍यांनी सुरु केलेल्या संपाच्या तिसर्‍या दिवशी शहरातील मार्केटयार्डातील भाजीपाला सर्व प्रकारच्या शेतमालाची आवक घटली. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने भावात १० ते २० टक्कयांनी वाढ झाली आहे. दरम्यान, फुलबाजारात झेंडू वगळता सर्व फुलांची आवक नेहमीच्या तुलनेत कायम आहे. मागणीच्या तुलनेत झेंडू कमी प्रमाणात बाजारात दाखल होत असल्याने भावात वाढ झाल्याचे सांगण्यात आले. 

मार्केट यार्डमधील घाऊक भाजीपाला बाजार शनिवारच्या साप्ताहिक सुट्टीमुळे बंद होता. मात्र, रविवारी आवकेत २०ते ३० टक्कयांनी घट झाल्याने दरात वाढ झाल्याची माहिती आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली. तर, फुलबाजारात सोलापूर, नगर तसेच इतर भागातून झेंडूची मोठ्या प्रमाणात आवक होते. मात्र, संपामुळे शेतकऱ्यांनी झेंडू फुलबाजारात विक्रीसाठी पाठवला नाही. परिणामी, झेंडूची आवक निम्म्याने घटून दरातही वाढ झाली आहे. मात्र, जिल्ह्यातून दाखल होणाऱ्या सर्व फुलांची आवक व दर कायम असल्याची माहिती फुलांचे व्यापारी सागर भोसले यांनी दिली. 

राष्ट्रीय किसान महासंघ, किसान क्रांती व अन्य संघटनांच्या वतीने शेतीमालास हमीभाव, सरसकट कर्ज व वीज बिलमुक्ती आदी मागण्यांसाठी दिनांक १ ते १० जून अशी संपाची घोषणा करण्यात आली आहे. त्याच्या पहिल्या दिवशी शहरात संपाचा कोणताच परिणाम जाणवला नव्हता. मात्र, आता शेतमालासह फळे तसेच फुलांची आवक घटण्यास सुरुवात झाली आहे.

 

Tags : farmer strike, day three, pune, pune news,supply of vegetable, pune market yard,price rate increase,