Tue, Apr 23, 2019 22:42होमपेज › Pune › क्या हुआ तेरा वादा? जयंत पाटलांचा पंतप्रधानांना सवाल 

क्या हुआ तेरा वादा? जयंत पाटलांचा पंतप्रधानांना सवाल 

Published On: Apr 11 2018 9:08PM | Last Updated: Apr 11 2018 9:08PMपिंपरी : प्रतिनिधी 

राष्ट्रवादीच्या ‘हल्लाबोल’ आंदोलनांतर्गत बुधवारी (दि. 11) काळेवाडी येथे झालेल्या सभेत माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी हा सूर्य हा जयद्रथ या पद्धतीने पंतप्रधान मोदींनी निवडणुकीआधी दिलेल्या आश्वासनांवर भाष्य केले व फसलेल्या आश्वासनांची पोलखोल केली.काळेवाडीत झालेल्या या सभेस माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, माजी सभापती दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, प्रवक्ते प्रशांत शितोळे, फजल शेख, माजी महापौर मंगला कदम, अपर्णा डोके, भाऊसाहेब भोईर, नाना काटे, मोरेश्‍वर भोंडवे आदी उपस्थित होते.

माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी ही सभा गाजविली, दृकश्राव्य माध्यमाचा त्यांनी त्यासाठी समर्पक उपयोग केला. निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आश्वासने कशी फोल व फसवी ठरली आहेत हे त्यांनी त्यांच्याच निवडणुकीआधीच्या व नंतरच्या वक्तव्याच्या व्हिडिओ क्लिपमधून  दाखवून दिले.

क्लिपला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. स्विस बँकेतील, परदेशातील काळा पैसा भारतात आणून प्रत्येक भारतीयाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होतील, हे मोदी यांचे लोकसभा निवडणुकीपूर्वीचे आश्वासन त्यांनी भाषणात दाखविले. निवडणुकीनंतर हा सर्व जुमला असल्याची अमित शहा यांची क्लिप दाखऊन त्यांनी भाजपची पोलखोल केली. दोन कोटी नोकर्‍यांच्या जुमल्यावरही पाटील यांनी टीका केली. वर्षाला 2 कोटीप्रमाणे चार वर्षात 8 कोटी लोकांना रोजगार मिळायला हवा होता. प्रत्यक्षात 41 लाख लोकांनी नोकर्‍या गमावल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली.

नोकर्‍या देण्याचे आश्वासन फोल ठरताच पकोडे तळणे, चहाचे दुकान, एजन्सी ही सुद्धा नोकरीच असल्याचे मोदींचे सांगणे, पंतप्रधान करू नका, पण देशाचे चौकीदार करा हे मोदींचे निवडणुकीपूर्वी सांगणे आणि नंतर निरव मोदी, चोक्सी आदींचे देशाला हजारो कोटी रुपयांचा चुना लावून परदेशात पळून जाणे, यातून त्यांनी भाजप, पंतप्रधान व शहा यांनी दिलेल्या आश्वासनांतील फोलपणा दाखवून दिला. पाकिस्तानला धडा शिकविण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा व पाकच्या कारवाया वाढल्या असताना पाकमध्ये जाऊन पाहुणचार घेणे यावरही त्यांनी भाष्य केले.

मोदी, शहा यांच्या जोडीने त्यांनी फडणवीस यांच्यावरही उपरोधिकपणे हल्लाबोल केला. त्यासाठी त्यांनी मेक इन महाराष्ट्र, मॅग्नेटिक महाराष्ट्र यांची उदाहरणे देत त्यासंदर्भातील फडणवीस यांच्या आधीच्या व नंतरच्या क्लिप दाखविल्या. माजी अर्थमंत्री एकनाथ खडसे यांचे विधानसभेतील उंदरावरील खोचक व बोचरे भाषणाची क्लिपही दाखवित त्यांनी भाजपची पोलखोल केली. आम्ही नाही भाजपचे लोकही त्यांच्या कारभारावर टीका करत आहेत,  यावरून हे सरकार कारभार करण्यास सक्षम आहे का याचा विचार जनतेने करावा असे पाटील म्हणाले. राज्य सरकारचे धनगर, मराठा, मुस्लिम आरक्षणाचे आाश्वासन हे कसे गाजर ठरले, हे सुद्धा त्यांनी दाखविले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत ‘क्या हुआ तेरा वादा’ हे गाणे वाजविले गेले. याआधी असे कधी झाले का, असा सवाल पाटील 
यांनी केला. 

 पेट्रोलचे दर अफगाणिस्थान सारख्या देशात 40 रूपये आहेत; मात्र अर्थव्यवस्था कोलंमडल्याने पेट्रोलमधून फायदा काढला जात आहे. भाजपच्या काळात 600 जातीय दंगली झाल्या. यांना चातुर्वर्ण्य व्यवस्था आणायची असल्याचे पाटील म्हणाले. बाहेरून आयात केलेल्यांना हाफ चड्डीची लाज वाटते म्हणून त्यांच्या आग्रहापोटी हाफची फुल झाल्याची मिस्कील टिपणी पाटील यांनी केली. दादा, पक्षाबाहेर गेलेल्यांना पुन्हा पक्षात घ्यायचे झाले; तर घ्या पण त्यांना पवित्र करण्यासाठी एक मंत्री नेमावा लागेल, अशी मिस्कील टिप्पणी पाटील यांनी केली.
 

Tags : pm nrendra modi,  jaynt patil, pimpri chinchwad, NCP halabol yatra