Sun, Jul 21, 2019 07:52होमपेज › Pune › फेसबुकवर बनावट अकाउंटद्वारे बदनामी करणारे दोघे अटकेत 

फेसबुकवर बनावट अकाउंटद्वारे बदनामी करणारे दोघे अटकेत 

Published On: Dec 29 2017 1:32AM | Last Updated: Dec 29 2017 1:20AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

तरुणीचे फेसबुकवर बनावट अकाउंट तयार करून बदनामी करणार्‍या दोन वेगवेगळ्या घटनांत दोन तरुणांना अटक केली आहे.   एकाला भारती विद्यापीठ पोलिसांनी,  तर दुसर्‍याला खडक पोलिसांनी अटक केली आहे.  

पहिली घटना भारती विद्यापीठ परिसरातील आहे. तरुणीचे फेसबुकवर बनावट अकाउंट तयार करून दोघांचे एकत्र असलेले फोटो पेस्ट करून तिच्या मैत्रिणींना फे्रंड रिक्‍वेस्ट पाठवून बदनामी करणार्‍या एकाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. गोविंद उद्धव पाटणकर (25, रा. मु. पो. गिरवली, अंबाजोगाई, बीड) असे पोलिस कोठडी झालेल्याचे नाव आहे. याबाबत 22 वर्षीय तरुणीने पोलिसांत फिर्याद दिली आहे. 

तरुणीचे फेसबुकवर बनावट अकाउंट तयार करून दोघांचे एकत्र असलेले फोटो पेस्ट करून तिच्या मैत्रिणींना फे्रंड रिक्‍वेस्ट पाठवून पाठलाग करणे तिला व्हॉट्सअ‍ॅपवरही अश्‍लील मॅसेज पाठविले. हा प्रकार दि. 10 नोव्हेंबर ते दि. 1 डिसेंबरदरम्यान घडला. त्याचा गुन्हा करण्यामागचा उद्देश काय होता? त्याने फेसबुकवर आणखी अकाउंट उघडली आहेत का? याचा तपास करण्यासाठी सरकारी वकील संजय दीक्षित यांनी कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती ग्राह्य धरली.

अशाच प्रकारच्या दुसर्‍या घटनेत अटक केलेल्या तरुणाचे नाव अथर इकबाल सोंडे (मु.पो. जसवली, ता. श्रीवर्धन, जि. रायगड) आहे. याबाबत स्वारगेट भागात राहणार्‍या 20 वर्षीय तरुणीने पोलिसांत फिर्याद दिली आहे. ही घटना 13 एप्रिल ते 9 जुलै 2016 या कालावधीत घडली.

अथर आणि फिर्यादी पूर्वी मित्र होते. मात्र, तिने आता त्याला लग्नास विरोध केला. त्यामुळे त्याने फेसबुकवर तिचे बनावट अकाउंंट उघडले. त्यावर अश्लील फोटो टाकून तिची बदनामी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात घटनेनंतर सव्वा वर्षाच्या कालावधीनंतर अथर याला अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. घटना घडल्यानंतर तपास केल्यानंतर तो परदेशात असल्याची माहिती समोर आली होती. याबाबत तपास करण्यासाठी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील संजय दीक्षित यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली.