Mon, Apr 22, 2019 11:41होमपेज › Pune › साथीदारांनी भेटण्यासाठी सादर केले बनावट आधार कार्ड, दोघांवर गुन्हा 

साथीदारांनी भेटण्यासाठी सादर केले बनावट आधार कार्ड, दोघांवर गुन्हा 

Published On: Jan 07 2018 2:03AM | Last Updated: Jan 07 2018 2:02AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

येरवडा कारागृहात असलेल्या आपल्या साथीदारांना भेटण्यासाठी  दोघांनी बनावट आधार कार्ड सादर केल्याचा धक्कादायक प्रकार कारागृहातील कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. कारागृह प्रशासनाने या दोघांना पकडून येरवडा पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांना नऊ तारखेपर्यंत पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. 

ओंकार राजू चौधरी व आकाश अनिल पोटघन अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी येरवडा कारागृहातील महिला रक्षक छाया तांबे (25, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार चौधरी व आकाश पोटघन या दोघांचे साथीदार एका गुन्ह्यात येरवडा कारागृहात आहेत. कारागृहातील दोघांना भेटण्यासाठी ते दोघे शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास आले. त्यांनी तेथील सुरक्षा रक्षकांकडे त्यांचे आधार कार्ड सादर करून नोंदणी केली. ते दोघे कैद्यांचे भाऊ असल्याचे भासवले. त्यानंतर रक्षकांना त्यांच्या आधार कार्ड व हालचालींबाबत संशय आल्याने त्यांनी दोघांना ताब्यात घेतले. त्या वेळी त्यांनी बनावट आधार कार्ड तयार करून ते सादर केल्याचे समोर आले. त्यानंतर प्रशासनाने त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी अटक करून दोघांना न्यायालयात हजर केल्यावर नऊ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास येरवडा पोलिस करत आहेत.