Tue, Jul 23, 2019 19:01होमपेज › Pune › ...अन् तो नेत्ररूपी उरला

...अन् तो नेत्ररूपी उरला

Published On: May 08 2018 1:54AM | Last Updated: May 08 2018 1:25AMपिंपरी : प्रतिनिधी 

विजेचा धक्का लागून घरातील एकुलत्या एका कमवत्या पुरुषावर काळाने घाला घातला आई, पत्नी, दोन लहान मुले असे कुटुंब उघड्यावर आले स्वतःच्या भवितव्यापुढे अंधार पसरला असताना मनाचा कणखरपणा दाखवत त्याचे कुटुंबीय पुढे आले  अन् त्यांनी त्यांचे मरणोत्तर नेत्रदान केले...त्यामुळे आज त्याचे अस्तित्व नेत्ररूपी उरले आहे. 

बॉम्बे कॉलनी, दापोडी येथील रहिवासी असलेले सूर्यकांत विष्णू वाजे यांचा नुकताच विजेचा धक्‍का लागल्याने मृत्यू झाला. ते 38 वर्षांचे होते. सूर्यकांत यांनी इलेक्ट्रीकल आयटीआय केला होता. ते उपजीविकेसाठी खासगी वायरम म्हणून काम करत होते. ज्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला त्या दिवशी ते साई चौक नवी सांगवी येथे घरगुती फिटींगच्या कामासाठी गेले होते. कामावर असतानाच अचानक त्यांना विजेचा धक्‍का बसला अन् त्यामध्येच त्यांचा मृत्यू ओढवला. त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी, दोन वर्षांचा मुलगा व तीन वर्षांची मुलगी, असा परिवार आहे. त्यांचा अचानक मृत्यू झाल्याने त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. 

सूर्यकांत यांची मरणोत्तर नेत्रदान करण्याची इच्छा होती. त्यांची ही इच्छा वेळोवेळी घरच्यांना बोलूनदेखील दाखवली होती. दुःखात असतानाही वाजे कुटुंबीयांनी सूर्यकांत यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्याची इच्छा पूर्ण केली. एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयात त्यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले. मरणानंतरही आपण या समाजाच्या उपयोगाला येऊ शकतो हे वाजे कुटुंबीयांनी दाखवून दिले आहे. सूर्यकांत यांचे अस्तित्व नेत्ररूपी राहणार असल्याचे समाधान त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्‍तकेली. वाजे कुटुंबीयांच्या या कणखरपणाचे परिसरात कौतुक होत आहे.