Wed, Feb 20, 2019 11:15होमपेज › Pune › धायरी येथे अज्ञात वस्तूचा स्फोट

धायरी येथे अज्ञात वस्तूचा स्फोट

Published On: Aug 09 2018 1:37AM | Last Updated: Aug 09 2018 12:51AM
पुणे / खडकवासला : प्रतिनिधी 

धायरी येथील डीएसके रोडवर अलोक पार्क सोसायटीत  बुधवारी पहाटे तीन वाजता स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाने हादरा बसून सोसायटीतील एका घराची काच फुटली, तर या प्रकारात मोठा आवाज झाल्याने परिसरात घबराट निर्माण झाली होती. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, पोलिसांना घटनास्थळावर बॉलबेअरिंगचे तुकडे सापडले आहेत. 
बुधवारी पहाटे झालेल्या या स्फोटाच्या फटाक्यांसारख्या मोठ्या आवाजाने काही काळ परिसरात घबराट पसरली होती. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी सोसायटी व परिसरात कसून शोध घेतला. त्यावेळी पोलिसांना बॉलबेअरिंगचे तुकडे  परिसरात सापडले. या प्रकारात एकाच घराच्या खिडकीची काच फुटली असल्याने हा प्रकार कोणीतरी जाणीवपूर्वक केला असावा. मात्र स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. त्याचा सखोल तपास सुरू आहे. हा प्रकार बॉम्बस्फोटाचा नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पहाटेच्या सुमारास वाहनातून आलेल्या व्यक्तींनी स्फोटक फेकल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. त्यांचा शोध सुरू आहे, असे सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील यांनी सांगितले.