Wed, Jul 24, 2019 12:23होमपेज › Pune › पुणे-नाशिक रेल्वेसाठी निम्म्या खर्चाचे हमीपत्र द्यावे

पुणे-नाशिक रेल्वेसाठी निम्म्या खर्चाचे हमीपत्र द्यावे

Published On: Jan 20 2018 1:41AM | Last Updated: Jan 20 2018 12:27AMपिंपरी : प्रतिनिधी

पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाची किंमत दुपटीने वाढली असून, या प्रकल्पाला 5341 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सदर रेल्वे प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू व्हावे यासाठी राज्य शासनाने प्रकल्पाचा निम्मा खर्च उचलण्याचे हमीपत्र रेल्वे बोर्डाला द्यावे, अशी मागणी शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली. 

गुरुवारी (दि.17 ) मलबार हिल, मुंबई येथे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील संसद सदस्य व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या बैठकीच्या वेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मागणी केली. 

याबाबत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अर्थसंकल्पामध्ये पुणे-नाशिक लोहमार्गाला मंजुरी दिली तेव्हा या प्रकल्पासाठी 2425 कोटींची तरतूद करण्यात आली होती. सध्या 213 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पासाठी 5341 कोटी इतक्या रकमेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. यामध्ये सुमारे 1300 ते 1500 कोटी इतका खर्च भूसंपादनाला अपेक्षित असून, उर्वरित रक्कम लोहमार्ग बनविण्यासाठी लागणार आहे. 

पूर्वीपेक्षा या प्रकल्पाची किंमत दुपटीने वाढली असून, सुरुवातीची काही वर्षे गुंतवणुकीतील परतावा मिळण्याबाबत नकारात्मक अहवाल असल्याने महाराष्ट्र शासनाने 50 टक्के खर्च उचलण्याचे हमीपत्र द्यावे, अशी सूचना रेल्वे मंत्रालय व रेल्वे बोर्डाने केली आहे.  महाराष्ट्र शासनाने हमीपत्र दिल्यानंतरच या कामाला वेग येणार असून, त्यानंतरच कामाची निविदा प्रक्रिया सुरू होऊ शकेल, अशी माहिती भारतीय रेल्वे बोर्डाचे चेअरमन अश्रीत लोहानी यांनी आपल्याला दिली असल्याचे आढळराव पाटील यांनी या वेळी नमूद केले. 

आढळराव पाटील म्हणाले की, पुणे-नाशिक लोहमार्गासाठी गेली 10-12 वर्षे आपण सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष केल्यानंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या लोहमार्गाला अर्थसंकल्पात मंजुरी दिली होती. या लोहमार्गाचा प्रकल्प अहवाल व अंदाजपत्रक रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आल्याची माहिती रेल्वेचे महाव्यवस्थापक शर्मा यांनी मागील काही महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीच्या वेळी मला दिली होती. हा लोहमार्ग झाल्यास येथील दळणवळण व कृषी व्यवसायामध्ये मोठी क्रांती घडून येणार आहे. 

पुणे-नाशिक लोहमार्गासाठी खर्चातील 50 टक्के वाटा उचलण्याचे यापूर्वीच राज्य शासनाने मान्य केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचा निम्मा खर्च उचलण्याचे हमीपत्र रेल्वे बोर्डाकडे लवकरात लवकर सादर करून या लोहमार्गाचे काम मार्गी लागण्यासाठी सकारात्मक पावले उचलतील, अशी मला अपेक्षा असून, गेल्या 12 वर्षांची माझी पुणे-नाशिक रेल्वेसाठीची तपश्चर्या सफळ व्हावी यासाठी मी हमीपत्रासाठी; तसेच लोहमार्गाचे काम प्रत्यक्ष लवकर सुरू व्हावे यासाठी राज्य सरकार व रेल्वे मंत्रालयाकडे चिकाटीने पाठपुरावा करून हा लोहमार्ग पूर्ण होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे आढळराव पाटील म्हणाले.