Fri, Apr 26, 2019 19:40होमपेज › Pune › जामिनावर सुटताच धुडगूस

जामिनावर सुटताच धुडगूस

Published On: Jun 11 2018 1:25AM | Last Updated: Jun 11 2018 1:23AMपुणे : प्रतिनिधी 

वाहन तोडफोड प्रकरणात जामिनावर सुटल्यानंतर पोलिसांना माहिती दिल्याच्या संशयावरून  सराईत गुन्हेगाराने साथीदारांसह मिळून एका तरुणासह त्याच्या अन्य दोन मित्रांवर जीवघेणा हल्ला करत परिसरात दहशत माजवली. या घटनेत एका तरुणावर कोयत्याने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हा प्रकार काळेपडळ येथे शनिवारी रात्री नऊ वाजता घडला. याप्रकरणी वानवडी पोलिसांत आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.सनी उर्फ गिरीष महेंद्र हिवाळे (20, काळेपडळ), चेतन ठेबे, आकाश भारती, विकास गालफाडे, ऋषिकेश कोलगे व त्यांचे इतर तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी किरण चव्हाण (26, हडपसर) या तरुणाने फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,31 मे रोजी सायंकाळच्या सुमारास  प्रदीप साममूर्ती हे काळेपडळ येथून जात असताना त्यांच्या कारची सनी हिवाळे व त्याच्या साथीदारांनी कोयत्याने तोडफोड केली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला 5 जून रोजी अटक केली होती. त्याच्यासोबत आणखी एकाला वानवडी पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर तो जामिनावर सुटला. दरम्यान फिर्यादी किरण चव्हाण व त्यांचे मित्र राहुल तडवी, तन्वीर शेख, विक्की दिघे असे सर्व जण शनिवारी रात्री नऊच्या सुमारास काळेपडळ येथील श्रीगणेश मोबाईल शॉप येथे गप्पा मारत उभे होते.

त्यावेळी सनी हिवाळे आणि त्याचे साथीदार तेथे आले. त्यांनी राहुल तडवी याला तू पोलिसांना माझी टिप का देतो, आम्ही फोर व्हिलर फोडली याची टिप पोलिसांना का दिली असे म्हणत शिवीगाळ करत मारहाण केली.त्यानंतर त्याच्यावर कोयत्याने वार केला. मात्र तो चूकवून तडवी पळाला. मात्र तेथे असलेल्या विक्की दिघे याने मी आईला घ्यायला आलो आहे. माझा काही संबंध नाही असे म्हणताच त्याच्या डोक्यात  आकाश भारती याने कोयत्याने वार केले. तसेच पोलिसात तक्रार दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच या परिसरात अचानक हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला. लोक घाबरून पळू लागले. त्यानंतर दुकानदारांनी दुकाने बंद केली. दरम्यान, सनी हिवाळेवर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत. तर त्याचे इतर साथीदार सराईत आहेत. सनी हिवाळे याला यापूर्वी कोयत्याच्या धाकाने खंडणी मागितल्याप्रकरणी अटक कऱण्यात आली होती.