Mon, Apr 22, 2019 16:09होमपेज › Pune › ‘विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करा’

‘विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करा’

Published On: Mar 03 2018 1:45AM | Last Updated: Mar 03 2018 1:34AMपिंपरी : महाराष्ट्रातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती कमी प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे त्यांना शिक्षणाचा खर्च भागविता येत नाही. त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करावी, अशा मागणीचे रयत विद्यार्थी मंचच्या वतीने  सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना साकडे घालण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले की, महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनेक विद्यार्थी हे अतिशय गरिबीच्या व हलाखीच्या परिस्थितीतून शिक्षण घेतात. केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारकडून मिळणार्‍या शिष्यवृत्तीमधूनच या विद्यार्थ्यांचे शिक्षण होते; पण सध्याची परिस्थिती पाहता मिळणारी रक्कम ही अल्प असून, यामध्ये  विद्यार्थ्यांचे  शिक्षण पूर्ण होत नाही. विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृती मिळत नाही. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी बँकेत खाते काढायला सांगितले जाते; परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष संपून गेले तरी खात्यावर शिष्यवृत्ती जमा होत नाही. शिष्यवृत्ती न मिळाल्यामुळे अनेक  खासगी संस्था या विद्यार्थ्यांना पूर्ण फी भरण्याची सक्ती करतात;  अन्यथा परीक्षेला बसू दिले जात नाही. यामुळे विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांना कर्ज काढून फी भरावी लागते, नाहीतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करावे लागते.

अनेक सरकारी शाळांमध्ये देखील फक्तआर्थिक, शोषित, पीडित, वंचित, कुटुंबातीलच विद्यार्थी शिक्षण घेतात. आर्थिक परिस्थितीअभावी चांगल्या शाळांमध्ये या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येत नाहीत. नाईलाजाने आई-वडील आपल्या पाल्यांना सरकारी शाळांमध्ये पाठवतात; परंतु अनेक सरकारी शाळांची परिस्थिती दयनीय आहे. इंग्लिश मीडियमच्या जमान्यात दिवसेंदिवस सरकारी शाळांचा दर्जा घसरत चालला आहे. सरकारी शाळांमध्ये शिक्षणाची गुणवत्ता खालावली आहे. राज्य शासन याकडे वारंवार  दुर्लक्ष करत आहे म्हणूनच पटसंख्येअभावी राज्यातील 1300 शाळा बंद करण्याची वेळ शासनावर आली आहे. स्पर्धेच्या व इंग्लिश मीडियमच्या युगात सरकारी शाळांचे अस्तित्व टिकवायचे असेल, तर सरकारी मराठी शाळा डिजिटल झाल्या पाहिजेत. मराठी शाळेत पण इंग्लिश विषयाचे शिक्षण दिले पाहिजे,

तरच पटसंख्या कायम राहील व मराठी शाळा टिकतील. त्यामुळे स्वतः दखल घेऊन विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्यासाठी व सरकारी शाळांची गुणवत्ता व शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी विशेष प्रयत्न करावेत, अशी मागणी रयत विद्यार्थी विचार मंचाच्या वतीने करण्यात आली. धम्मराज साळवे, संतोष शिंदे, संदेश पिसाळ, अंजना गायकवाड, शशिकांत कुंभार,   रोहित कांबळे, आदिनाथ कांबळे, नीरज भालेराव, अनिल भंडारी, मेघा आठवले, अतुल वाघमारे आदी या वेळी उपस्थित होते.