Fri, Apr 26, 2019 16:04होमपेज › Pune › पुणे: नग्नावस्थेत ‘सन बाथ’ घेताना अभियंता तावडीत

पुणे: नग्नावस्थेत ‘सन बाथ’ घेताना अभियंता तावडीत

Published On: Feb 26 2018 1:17AM | Last Updated: Feb 26 2018 1:17AMवेल्हे: प्रतिनिधी 

सिंहगड किल्ल्यावर दूरदर्शन केंद्राच्या इमारतीच्या पाठीमागे वर्दळीच्या रस्त्यालगत नग्न अवस्थेत रविवारी (दि. 25) सकाळी साडेआठ वाजता मौज करत खुर्चीवर बसलेल्या दूरदर्शन केंद्राच्या सहाय्यक अभियंत्यास हवेली पोलिसांनी अटक करून गजाआड केले. लतिफ सय्यद (वय 50, रा. वानवडी, पुणे) असे या अभियंत्याचे नाव आहे. 

दरम्यान, सिंहगडावर मद्यपान तसेच मांसाहारास बंदी असतानाही गडावरील सरकारी कार्यालयात, तसेच आडबाजूस दारूच्या पार्ट्या राजरोसपणे सुरू असल्याचे चित्र पुढे आले आहे. दूरदर्शन केंद्राच्या इमारतीच्या आवारात दारूच्या रिकाम्या बाटल्यांचे ढिगारे पडले आहेत. 

याप्रकरणी स्वप्निल जांभळे (रा., जांभुळवाडी, आंबेगाव खुर्द) याने हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. लतिफ सय्यद याच्याविरुद्ध भादवि 295, 509 कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. हवेलीचे पोलीस निरीक्षक विश्वंभर गोल्डे तपास करीत आहेत. नग्न अवस्थेत सिंहगडावर मौज करणार्‍या सय्यद याला तातडीने सरकारी सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी स्थानिक मावळा जवान संघटनेने केली आहे. 

गड संवर्धन समितीचे कार्यकर्ते स्वप्निल जांभळे, प्रसाद दागंट, नामदेव धिंडले, बापू कुतवळ, प्राची विचारे, चैत्राली रांजणे आदी रविवारी सकाळी सिंहगडावर स्वच्छता करण्यासाठी गेले होते. स्वच्छतेसाठी बुरुज, तटबंदीच्या जागा शोधत सर्वजण गडावर फेरफटका मारत होते. त्यावेळी दूरदर्शन केंद्राच्या इमारतीच्या पाठीमागे असलेल्या ठिकाणी नग्न अवस्थेत दूरदर्शन केंद्राचे सहाय्यक अभियंता लतिफ सय्यद खुर्चीवर बसलेला महिला कार्यकर्त्यांनी पाहिले.  गडाच्या पुणे दरवाज्याकडून दूरदर्शन केंद्राजवळील बुरूजांकडे जाणार्‍या वर्दळीच्या मार्गावरच दूरदर्शन केंद्राची इमारती असल्याने तेथून ये-जा करणार्‍या पर्यटकांनीही सय्यद याला नग्न अवस्थेत पाहिले. स्वच्छता मोहिमेच्या कार्यकर्त्यांनी तेथे धाव घेतली असता सय्यद उन्हात नग्न  बसला होता. त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करत कार्यकर्त्यांनी त्याला जाब विचारला असता, आजारपणामुळे सन बाथ घेत असल्याचे उत्तर त्याने दिले. नंतर टॉवेल कमरेला गुंडाळत त्याने आत धाव घेतली. हवेली पोलीस ठाण्याचे हवालदार एस. सी. शेंडगे, बी. जी. जगताप यांच्या पथकाने गडावर जाऊन सय्यद याला ताब्यात घेतले.  सिंहगडासारख्या  ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी, तसेच केंद्र सरकारच्या दूरदर्शन केंद्राच्या आवारात नग्न अवस्थेत बसलेल्या सय्यद याच्याविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन, तसेच भावना दुखावल्याच्या आरोपीखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने असे वर्तन कशासाठी केले, याचा तपास केला जात असल्याचे हवेली पोलिसांनी सांगितले. 

छत्रपती शिवाजीमहाराजांनी स्थापन  केलेल्या हिदंवी स्वराज्याच्या रक्षणासाठी नरवीर तानाजी मालुसरे व वीर मावळ्यांनी बलिदान देणार्‍या सिंहगडावरील सरकारी दूरदर्शन केंद्राच्या आवारात खासगी मालमत्ता समजून नग्न अवस्थेत मौज करणार्‍या लतिफ सय्यद यास सरकारी सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी संतप्त शिवभक्त तसेच स्थानिक मावळ्या रहिवाशांनी केली आहे.
दारू पार्ट्या झोकात सुरू

सिंहगडावरील दूरदर्शन केंद्र, तसेच इतर केंद्रांत, तसेच खासगी इमारतीत  खासगी मालमत्ता असल्यासारखे त्याचा उपयोग मद्यपान, पार्ट्यांसाठी   केला जात आहे. येथे दारूच्या पार्ट्या होत आहेत, आणि दुसरीकडे छत्रपती शिवरायांच्या गडाचे पावित्र्य राखण्यासाठी मावळे तरूण जीवाचे रान करीत आहेत.