Sat, Mar 23, 2019 12:47होमपेज › Pune › मगर जलतरण तलावाचे हाल संपता संपेनात

मगर जलतरण तलावाचे हाल संपता संपेनात

Published On: Jul 06 2018 1:34AM | Last Updated: Jul 06 2018 12:13AMभोसरी : विजय जगदाळे

मगर जलतरण तलाव अनेक समस्यांनी ग्रासला आहे. कधी पाणी खराब, एकच जीवरक्षक, शॉवरसाठी पाणीच नाही अशा अनेक कारणास्तव जलतरण तलाव बंद ठेवण्याचे प्रकार घडत आहेत. त्यातच अनेक महिन्यापासून आंघोळीचे शॉवर बंद आहेत. परिसरातील अनेक दिवे बंद आहेत. वेळेत साफसफाईचे साहित्य मिळत नसल्यने दुर्गंधी पसरली आहे. नूतनीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून देखील समस्या सुटण्याचे नाव घेईना. वारंवार तलाव बंद ठेवण्याची नामुष्की पालिकेच्या क्रीडा विभागावर येत असून, पासधारकांची तसेच पोहण्यास येणार्‍यांची मोठी गैरसोय होत आहे. 

नेहरूनगर येथील कै. अण्णासाहेब मगर जलतरण तलावावर शहरातील विविध भागातून जलतरणपटू नियमित सरावासाठी येतात. महापालिकेतील आजी-माजी नगरसेवक, अधिकारी, पासधारक, ज्येष्ठ नागरिक  नियमितपणे तलावावर पोहण्यासाठी व व्यायाम करण्यासाठी येत असतात. वजनदार पदाधिकार्‍यांचा तलावावर वावर असूनही मगर तलाव समस्यांच्या गर्तेतून सुटणार तरी कधी, असा संताप सवाल जलतरणप्रेमी करीत आहेत.

नाव्याने टाकण्यात आलेल्या ड्रेनेज लाईन वारंवार चोकप होत असेल्याने पाणी रस्त्यावर पडत आहे. अनेक ठिकाणच्या डेकवरील फरश्या तुटलेल्या आहेत. लाखो रुपये खर्च करून बसविण्यात आलेली कारंजी अद्यापही सुरु नाहीत. बेबी तलाव देखील नादुरुस्त असल्याने लहान मुलांची गैरसोय होत आहे. तसेच पाण्याची एक लाईन बंद स्थितीत आहे. त्यामुळे जलतरणपटूंना दररोजच समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत. या समस्येतून सुटका होणार की नाही, असा प्रश्न जलतरणप्रेमींना पडला आहे.