Thu, Sep 20, 2018 20:36



होमपेज › Pune › पोलिसांच्या धक्क्याने चौथ्या मजल्यावरून पडल्याचा आरोप

पोलिसांच्या धक्क्याने चौथ्या मजल्यावरून पडल्याचा आरोप

Published On: Jan 24 2018 1:47AM | Last Updated: Jan 24 2018 1:29AM



पिंपरी : प्रतिनिधी

अतिक्रमण कारवाईच्या वेळी आपले घर पाडले जाणार, ही भीती देवीबाई पवार यांच्या मनात आली. आपल्या डोक्यावरचे छप्पर पडणार या नैराश्यातून त्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर गेल्या. त्यांनी तेथून खाली उडी मारली. यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांचे दोन्ही पाय ‘फ्रॅक्चर’ झाले. दरम्यान, कारवाईच्यावेळी अतिक्रमण पथकातील पोलिसांनी धक्का दिल्याने त्या खाली पडून त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप या महिलेच्या नातेवाइकांनी केला आहे.

प्राथमिक उपचार करून देवीबाई यांना थेरगाव येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पिंपळे गुरव येथे आणि रुग्णालय परिसरात नागरिक, नातेवाईक, मित्रमंडळींनी मोठी गर्दी केली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी महिलेचा मृतदेह औंध जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवला आहे.  काही दिवसांपूर्वी पिंपळे गुरव येथील मोरया पार्क या पाच मजली इमारतीवर कारवाई सुरू असताना एका रहिवाशाने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर आज ही धक्कादायक घटना घडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

महापालिकेसमोर मोठा  पोलिस बंदोबस्त...

पिंपळे गुरव येथे घडलेल्या घटनेनंतर संतप्त जमावाने परिसरात तणाव निर्माण केला. थेरगाव येथील आदित्य बिर्ला रुग्णालयातही गर्दी केली; तसेच मृतदेह महापालिकेसमोर आणणार असल्याचे समजल्याने खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेसमोर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला; तसेच पालिकेत जाणार्‍या रस्त्यावर बॅरिकेट्स लावण्यात आले.


दगडफेक, तणावाचे वातावरण...

महिलेच्या मृत्यूनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी पोकलेन मशिन व जेसीबीवर दगडफेक केली. दगडफेकीनंतर परिसरातील कारवाईचे काम प्रशासनाने तातडीने थांबवले; घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलिस ठाण्यातील सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांना घटनास्थळी रवाना करण्यात आले. पोलिस घटनास्थळी पोचल्यानंतर वातावरण थोडेसे शांत झाले. सहायक पोलिस आयुक्त विक्रम पाटील यांनी नातेवाईक आणि जमावाचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला.

महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आदेशानंतर शासकीय कामकाज सुरू होते. याबाबतच्या नोटिसाही नागरिकांना बजावण्यात आल्या होत्या. पिंपळे गुरव परिसरात कारवाई सुरू असताना महिलेने चौथ्या मजल्यावरून खाली उडी मारली आहे. प्रथमदर्शनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे दिसत आहे. पोलिसांकडे आत्महत्येची नोंद केली आहे.    - गणेश शिंदे, पोलिस उपायुक्त