Sat, Jul 20, 2019 08:33होमपेज › Pune › कोल्हापूर, मिरजसह आठ स्टेशनवर सरकते जिने

कोल्हापूर, मिरजसह आठ स्टेशनवर सरकते जिने

Published On: Feb 07 2018 2:47PM | Last Updated: Feb 07 2018 2:47PMपुणे : प्रतिनिधी 

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाअंतर्गत येणार्‍या 8 स्थानकांवर लवकरच सरकते जिने (एस्कलेटर) बसविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोल्हापूर, मिरज, शिवाजीनगर, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, देहू रोड, तळेगाव स्थानकाचा या यादीत समावेश असून येत्या दोन-तीन महिन्यांत सरकते जिने बसविण्याच्या कामास सुरूवात होणार आहे. सरकत्या जिन्यांमुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांची फार मोठी सोय होणार असून त्यांना त्याद्वारे स्थानकाच्या दुसर्‍या बाजूस जाता येणे सहज शक्य होणार आहे. 

पंचवीस हजार व त्यापेक्षा अधिक प्रवासी संख्या असणार्‍या तब्बल ६०० स्थानकांवर सरकते जिने बसविण्यात येणार असून, ही सर्व स्थानके जागतिक दर्जाच्या सोयीसुविधांनी सुसज्ज करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रेल्वे बजेटमध्ये केली होती. त्याअंतर्गतच पुणे विभागातील आठ स्थानकांवर सरकते जिने बसविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 
दरम्यान, पुणे विभागातील सर्व स्थानकांवर लवकरच मोफत वाय-फाय सुविधा देण्यात येणार आहे, अशी माहिती मिळाली आहे. सद्यःस्थितीत पुणे, कोल्हापूर, मिरज स्थानकांवर वाय-फाय सुविधा उपलब्ध आहे. लोहमार्ग नूतनीकरणाच्या कामास येत्या काही दिवसांत वेग येणार असून लवकरच ते पूर्णत्वास येईल, असे सांगण्यात आले.