Sat, Jul 20, 2019 10:59होमपेज › Pune › ‘आयसीयू’ पाहिजे; वशिला लावा

‘आयसीयू’ पाहिजे; वशिला लावा

Published On: Mar 11 2018 1:03AM | Last Updated: Mar 10 2018 11:16PMपिंपरी : प्रदीप लोखंडे

‘वायसीएम’ रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभाग (आयसीयू) पाहिजे असेल, तर वशिला लावावा लागत आहे. सर्वसामान्य रुग्ण उपचारासाठी गेले असता जागा नसल्याचे सांगून त्यांना इतर रुग्णालयांची वाट दाखवली जात आहे. ‘आयसीयू’ पाहिजे असेल, तर एखाद्या राजकीय नेत्याचा वशिला लावावा लागत आहे. त्यानंतरच प्रवेश मिळत आहे. या वशिलेबाजीमुळे सर्वसामान्य रुग्णांची मात्र गैरसोय सोय आहे.

महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय सर्वसामान्य रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. सुमारे 700 बेडचे हे रुग्णालय आहे. रुग्णांवर व्यवस्थित उपचार होतील यासाठी पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ, तळेगाव व विविध ग्रामीण भागातून रुग्ण उपचारासाठी येत आहेत. दिवसाकाठी सुमारे 1200 रुग्णांची बाह्य विभागात नोंद होत आहे. या रुग्णालयात तीन ‘आयसीयू’ आहेत. यामधील एक ‘आयसीयू’ सध्या देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी बंद आहे. इतर दोन ‘आयसीयू’ 35 बेडची आहेत. अतिगंभीर रुग्णांवर उपचार करायचे असेल, तर ‘आयसीयू’ विभागात दाखल करावे लागत आहे; मात्र अनेक वेळा या विभागात जागा नसल्याचे कारण सांगून इतर रुग्णालयांची वाट दाखवली जात आहे.

त्यामुळे अतिगंभीर रुग्णांच्या ते जिवावर बेतत आहे. ‘आयसीयू’मध्ये दाखल होण्यासाठी राजकीय नेत्यांची अथवा मोठ्या सामाजिक कार्यकर्त्यांची शिफारस लागत आहे. तेथील अधिकार्‍यांना संबंधित नेत्यांचे फोन गेल्यानंतर त्वरित ‘आयसीयू’ उपलब्ध होत आहे. गंभीर आजारी असलेले सर्वसामान्य रुग्ण उपचारासाठी गेले असता त्यांना ‘आयसीयू’मध्ये जागा नसल्याचे संबंधित डॉक्टर सांगत आहेत. त्यामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ‘आयसीयू’ची संख्या अथवा बेडची संख्या वाढविण्याची मागणी शहरातील रुग्णांचे नातेवाईक करत आहेत. याबाबत संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क साधला साधला असता तो होऊ शकला नाही.

नेत्यांच्या ‘पीए’चा वावर

‘वायसीएम’ रुग्णालयात राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा वावर वाढला आहे. आपल्या कार्यकर्त्यांना कोणती अडचण येऊ नये यासाठी राजकीय नेत्यांनी आपले खासगी सचिव या ठिकाणी नेमले आहेत. ते सर्व विभागात फिरून आपल्या नेत्याच्या कार्यकर्त्यांची शिफारस करत असतात. त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टरांच्या डोक्याला ताप झाला असल्याचे चित्र आहे.

माझ्या एका नातेवाइकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. रुग्ण गंभीर होता, तरी ‘आयसीयू’मध्ये दाखल करून घेत नव्हते. या विभागात जागा नसल्याचे तेथील डॉक्टर सांगत होते. याबाबत जाब विचारत वाद घालावा लागला. त्यानंतर रुग्णावर उपचार सुरू केले.     - सतीश कदम