Mon, Jun 17, 2019 18:22होमपेज › Pune › महापौरपद कोणत्या गटाकडे जाणार याची उत्सुकता

महापौरपद कोणत्या गटाकडे जाणार याची उत्सुकता

Published On: Jul 25 2018 1:38AM | Last Updated: Jul 25 2018 1:19AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील महापौर नितीन काळजे आणि उपमहापौर शैलजा मोरे यांनी मंगळवारी (दि.24) पदाचे राजीनामे दिले. त्यामुळे त्या पदासाठी सत्ताधारी भाजपमध्ये तीव्र स्पर्धा सुरू झाली आहे. भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, पक्षाचे सहयोगी अपक्ष आमदार महेश लांडगे की निष्ठावंत गटाच्या नगरसेवकाच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडते याची उत्सुकता महापालिका वर्तुळात आहे. 

महापौरपदासाठी आमदार जगताप गटाचे समर्थक शत्रुघ्न काटे, तुषार कामठे, शशिकांत कदम, आमदार लांडगे गटाचे समर्थक राहुल जाधव, संतोष लोंढे, वसंत बोराटे आणि निष्ठावंत गटाचे  नामदेव ढाके, शीतल शिंदे हे तीव्र इच्छुक आहेत. त्यामुळे महपौर पद कोणत्या गटाकडे जाणार यावर जोरदार चर्चा रंगली आहे. सध्या स्थायी समिती अध्यक्षपद चिंचवड मतदार संघाकडे आहे. तर, महापौरपद भोसरी मतदार संघाकडे आहे. त्या सुत्रानुसार या पदाची निवड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

सत्तारूढ भाजपने महालिकेत पाच वर्षााच्या कार्यकाळात प्रत्येक नगरसेवकाला एक तरी पद देण्याचे धोरण निश्‍चित केले आहे. त्यानुसार स्थायी समितीमध्ये प्रत्येक नगरसेवकांना एका वर्षाचा कार्यकाळाची संधी देण्यात आली. तसेच, क्षेत्रीय समिती अध्यक्ष पदही वर्षांसाठी दिले गेले. महापौरपदासाठी स्थायी समिती सभापतीपदासाठी डावलण्यात आलेले आमदार लांडगे यांचे समर्थक राहुल जाधव, संतोष लोंढे, वसंत बोराटे, आमदार जगताप यांचे समर्थक शत्रुघ्न काटे, तुषार कामठे, शशिकांत कदम आणि निष्ठावंत गटाचे नामदेव ढाके, शीतल शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. ते या पदासाठी तीव्र इच्छुक आहेत. त्या दृष्टीने त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. 

दरम्यान, शत्रुघ्न काटे यांच्या जात वैधता पडताळणी प्रमाणपत्रावर आक्षेप घेण्यात आला आहे. फेरपडताळणी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. महापौरांसह उपमहापौर पद कोणत्या गटाकडे आणि कोणत्या नगरसेवकाकडे जाते यांची चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली आहे. नगरसेवकांच्या वेगवेगळ्या नावावर चर्चा होत असून, कश्याप्रकारे निवड होईल, याचे आखाडे बांधले जात आहेत.

विविध समित्यांप्रमाणे नगरसेविकेस संधी?

भाजप सत्ताधार्‍यांनी विविध समिती सभापतिपदावर नगरसेविकांना अधिकाधिक संधी दिली आहे. स्थायी, शिक्षण, विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा आणि जैव विविधता आदी समिती सभापतिपदी नगरसेविकांची नियुक्ती केली गेली आहे.  तसेच, ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ई’ आणि ‘फ’ क्षेत्रीय समितीच्या अध्यक्षपदी नगरसेविकांनाच संधी दिली आहे. तसेच, उपमहापौरपदही नगरसेविकेकडे होते. भाजपच्या नगरसेविकांना सर्वाधिक पदावर संधी देण्याचे धोरण कायम राहिल्यास महापौर व उपमहापौरपद नगरसेविकांच्या गळ्यात पडल्यास शहरवासीयांना आश्‍चर्य वाटणार नाही.