Thu, Jul 18, 2019 16:32होमपेज › Pune › शाळकरी मुले ओढतात ई-सिगारेटचे झुरके

शाळकरी मुले ओढतात ई-सिगारेटचे झुरके

Published On: Mar 05 2018 2:04AM | Last Updated: Mar 05 2018 2:04AMपुणे :  अक्षय फाटक

दारूचे घोट रिचवणे, सिगारेटचे झुरके घेणे हे महाविद्यालयीन तरुणांचे ‘स्टेटस सिम्बॉल’ बनत असताना हीच नकारात्मक क्रेझ  शाळकरी अल्पवयीन मुलांमध्येही वाढत आहे.  पुण्याच्या मध्यवस्तीतील काही नामांकित शाळांत शिकणार्‍या 40 ते 45  मुलांच्या दप्‍तरात ‘इलेक्ट्रॉनिक्स सिगारेट’ अर्थात मोबाईल हुक्का (ई-सिगारेट) सापडल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  विशेष म्हणजे धूम्रपानाचा आधुनिक प्रकार असलेल्या या ई-सिगारेट्स टपर्‍या, स्टेशनरी दुकाने आणि ऑनलाईन पद्धतीने सहजरीत्या उपलब्ध होत आहेत.  शाळकरी मुले व्यसन म्हणून नव्हे तर ‘फॅशन’ म्हणून या ई-सिगारेटचे झुरके घेत आहेत, हे लक्षात आल्यावर शाळा प्रशासन व संबंधित पालकांनी व्यसनमुक्ती केंद्राकडे धाव घेतली आहे.    

वाचा : ओळखा आयुर्वेदिक औषधांची शुद्धता

विद्येच्या माहेरघरात शिक्षण व कामानिमित्त आलेला तरुणवर्ग व्यसनाधीनतेच्या जाळ्यात ओढला जात आहे.  महाविद्यालयीन तरुणांबरोबरच अल्पवयीन मुलेही हे व्यसन करत आहेत. शहरातील  काही मोजक्या टपर्‍यांवर लहान मुलांना सिगारेट दिली जात नाही. मात्र, शाळा परिसरातील टपर्‍यांवर त्याची खुलेआम विक्री केली जाते. नियमानुसार शाळांच्या परिसरापासून 100 मीटरच्या आतील टपर्‍यांवर, दुकानांवर किंवा इतर मार्गाने तंबाखू व तत्सम नशा आणणारे पदार्थ विक्री करण्यास बंदी आहे. मात्र, याचे सर्रास उल्लंघन  होत आहे. 

वाचा : तुम्ही अपुरी झोप घेताय?; हा धोका आहे

गेल्या आठवड्यात मध्यवस्तीतील काही शाळांमध्ये तसेच खाजगी क्‍लासेसमधील विद्यार्थ्यांकडे इलेक्ट्रॉनिक्स सिगारेट मिळाल्यावरून हे स्पष्ट होत आहे. ‘पेट्रोल’ आणि ‘फेवीक बॉण्ड’ची नशा करणार्‍या मुलांचेही प्रमाण वाढत आहे.  शिक्षण घेण्याच्या वयात मुले व्यसनाकडे वळत असल्याने शाळा प्रशासन व पालक धास्तावले आहेत. शहरातील कोथरूड, लॉ कॉलेज, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता या भागातील शाळांमध्ये ई-सिगारेट ओढणार्‍या मुलांचे प्रमाणे मोठे आहे. अनेक विद्यार्थी अशा प्रकारचे नशेचे नवे साधन वापरत आहेत. मात्र शाळा प्रशासन व पालक अनभिज्ञ असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


शहरातील चार शाळांमधील विद्यार्थी

उच्चभ्रू समजल्या जाणार्‍या कोथरूड, लॉ कॉलेज रस्ता, नळ स्टॉप तसेच फर्ग्युसन रस्ता आणि जंगली महाराज रस्त्यावर या ई-सिगारेट सहज उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत आहे. टपर्‍या, दुकानांमध्ये या ई-सिगारेटची विक्री होत आहे. चार शाळांमधील 40 ते 45  मुलांकडे  मोबाईल हुक्का सापडला आहे. खाजगी क्‍लासमधील एका शिक्षकाने हा प्रकार समोर आणला आहे. त्यानंतर आनंदवन व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्राच्या डॉ. अजय  दुधाने यांच्याशी संपर्क साधून त्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतरच्या पाहणीत ही ई-सिगारेट मिळणारी ठिकाणे आढळून आली आहेत. 

वाचा  : जेवणाची पद्धत आहे का योग्य?


लहान मुलांपासून तरुणांपयर्र्ंत विविध प्रकारच्या नशा करण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामध्ये बिनवासाच्या नशेचाही समावेश आहे.  या सर्व नशेच्या साधनांची मुख्य भागात खुलेआम विक्री होत आहे. ई-सिगारेटसह हुक्क्का, गांजाकडे किशोरवयीन मुलेही  आकर्षित होत आहेत. परिणामी त्यांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. शाळा, पालक आणि समाज म्हणून आपण याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. यावर बंदी घालण्याचीही गरज आहे. 
 

 -डॉ. अजय दुधाने, आनंदवन व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्र, पुणे 

काय आहे मोबाईल हुक्का? 

ई-सिगारेट ही एक मशिन असून, ती मोबाईलप्रमाणे चार्ज केली जाते. यासोबत चार्जरही दिला जातो. विविध तंबाखूजन्य पदार्थ या ई-सिगारेटमार्फत जाळले जातात. त्यातून जो धूर निघतो तो तोेंडावाटे आत घेऊन बाहेर सोडला जातो. या ई-सिगारेटची किंमत 400 ते 500 रुपये आहे. तर त्याचा एक फ्लेवर 100 रुपयांना मिळतो. विशेष म्हणजे ही सिगारेट ओढल्यानंतर त्याचा वास येत नाही. त्यामुळे शाळकरी मुले याचा सर्रास वापर करत आहेत. या ई-सिगारेटला मोबाईल हुक्का म्हणूनही ओळखले जाते.