Sat, Jul 20, 2019 21:41होमपेज › Pune › शिक्षणाच्या माहेरघरी भामटेगिरी! 

शिक्षणाच्या माहेरघरी भामटेगिरी! 

Published On: May 18 2018 1:31AM | Last Updated: May 18 2018 1:30AMपुणे : प्रतिनिधी 

संगनमताने बनावट पीएच.डी. पदवी प्राप्त करून ती पदवी खरी असल्याचे भासवून औंध येथील स्पायसर अ‍ॅडव्हेंटीस्ट युनिव्हर्सिटीत पदोन्नती; तसेच आर्थिक फायदे घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी कुलगुरूंसह 5 जणांवर चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील या नामांकित खासगी विद्यापीठाच्या कुलगुरू व वरिष्ठ पदाधिकार्‍यांकडून हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. 2010 ते 2013 दरम्यान ही पीएच.डी. पदवी मिळविल्याचे पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये म्हटले आहे. कुलगुरू नोबल प्रसाद पिल्‍ले,  वरिष्ठ अधिकारी आर्थिक विभाग रत्नास्वामी जयेम, विभाग अधिकारी (आर्ट्स) चाको पॉल;  तसेच क्रिएटिव्ह एज्युकेशनल फाउंडेशनचे संचालक गोपाल भिकाजी खंदारेसह एकावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. 

या प्रकरणी अ‍ॅलन अलमेडिया (53, रा. सॅलिसबरी पार्क, पुणे) यांनी चतुःशृृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अ‍ॅलन यांना सामाजिक कार्याची आवड असून, ते मागील चार दशकांपासून एका चर्चचे सदस्य आहेत. दि. 27 सप्टेंबर 2017 ते 4 ऑक्टोबर 2017 दरम्यान त्यांनी माहितीच्या अधिकारामध्ये पत्र देऊन पिल्‍ले यांच्याकडे असलेल्या पीएच.डी.बाबत माहिती मागविली होती. त्यानंतर 5 जानेवारी 2018 रोजी पुन्हा माहिती मिळावी, यादृष्टीने याबाबत पुन्हा अर्ज केला. त्यानुसार संस्थेकडून संस्था खासगी असून, माहिती अधिकाराचे नियम लागू होत नसल्याचे अ‍ॅलन यांना कळविण्यात आले. त्यामुळे कुलगुरूंच्या पीएच.डी. पदवीबद्दल साशंकता आणखीच वाढली. त्यानंतर अ‍ॅलन यांनी पोलिसांकडे याबाबत धाव घेतली. पोलिसांना फिर्यादी अ‍ॅलन यांच्या वतीने मिळालेल्या अर्जानुसार त्यांनी अर्जाचा विचार करून त्या अनुषंगाने तपास केला.

त्यानंतर मिळवलेली पदवी ही बनावट असल्याबाबत माहिती मिळाल्यानंतर पाचही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची व्याप्‍ती मोठी असल्याने हा गुन्हा गुन्हे शाखेकडे तपासासाठी देण्यात आला आहे. उपायुक्‍त पंकज डहाणे, सहायक आयुक्‍त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन भोसले-पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक डी. के. कापरे हे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.


पुणे/येरवडा : प्रतिनिधी 

पुण्यातील नामांकित बिशप्स शाळेत प्रवेश मिळावा यासाठी एका तरुणाने भलतीच शक्‍कल लढवल्याचे उघडकीस आले आहे. जवळच्या व्यक्तीच्या मुलांना शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी संबंधित तरुणाने इंटरनेटवरून पीएमओ कार्यालय आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या कार्यालयाची राजमुद्रा असलेले लेटरपॅड तयार केले होते. असे कृत्य करणार्‍या तरुणाविरुध्द येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रणव विजय चौधरी (21, रा. सोमवार पेठ, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी बिशप्स स्कूलचे प्राचार्य शेन मेकफरसन (39, रा. बिशप्स कोएड स्कूल, कल्याणीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणवने इंटरनेटवरून पीएमओ कार्यालय आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या कार्यालयाचे राजमुद्रा असलेले लेटर पॅड तयार केले. 

त्यावर शिफारसपत्र  बनविले. या पत्रामुळे आता शाळेत ताबडतोब प्रवेश मिळेल असे त्याला वाटले. त्यानंतर ही शिफारसपत्रे शाळेत जमा केली. परंतु, ही शिफारसपत्रे बनावट असल्याचे शाळेच्या प्राचार्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली.प्रारंभी कल्याणीनगर येथील बिशस शाळेमध्ये दोन मुलांना प्रवेशासाठी प्रणव चौधरी याने आपले नाव प्रणव इदाते असल्याचे बिशप्सच्या प्राचार्यांना सर्वप्रथम  सांगितले. मात्र बिशप्सचे प्राचार्य शेक मेकफरसन याना प्रणवने जोडलेल्या शिफारस पत्रावरून  संशय आल्याने त्यांनी खात्रीसाठी पीएमओ कार्यालयाकडे संपर्क केला. पीएमओ कार्यालयाने सदरची पत्रे व सही आपली नसल्याचे कळवल्यिानंतर प्राचार्यांनी  थेट येरवडा पोलिसांकडे तक्रार केली.

सदर प्रकरण गंभीर असल्याचे पाहून वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुंकुंद महाजन यांनी तातडीने गुन्हा दाखल करून घेतला व आरोपीच्या तपासासाठी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब बहिरट, हवालदार अझिज बेग, नागेश कुंवर, अजय पाडोळे यानी प्रणव यास अटक केली. प्रणव याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिस उपनिरीक्षक रविंद्र गवारी यांनी सांगितले. त्यास न्यायालयासमोर हजर केले असता दि.21 मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक गवारी करत आहेत. शाळा प्रवेशासाठी थेट पंतप्रधान कार्यालयाचे बनावट पत्र वापरल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.