Fri, Aug 23, 2019 21:41होमपेज › Pune › डीएसके चौकशीसाठी पोलिसांपुढे हजर

डीएसके चौकशीसाठी पोलिसांपुढे हजर

Published On: Feb 08 2018 1:52AM | Last Updated: Feb 08 2018 12:26AMपुणे : प्रतिनिधी

महाराष्ट्रातील ठेवीदारांचे हितसंरक्षण कायद्यानुसार (एमपीआयडी) दाखल असलेल्या गुन्ह्यात बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी हे बुधवारी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेसमोर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चौकशीसाठी हजर झाले. त्यांची सकाळी अकरापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत चौकशी सुरू होती. पुढील आणखी चार दिवस त्यांना आर्थिक गुन्हे शाखेकडे फेर्‍या माराव्या लागणार आहेत. 

ठेवीदारांच्या ठेवी परत देण्यासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद करून ती न्यायालयात जमा करण्यास असमर्थ ठरल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने डीएसकेंना चांगलेच फैलावर घेत पाच दिवस पोलिसांसमोर हजर राहून गुन्ह्याच्या तपासासाठी सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, डीएसके दाम्पत्य बुधवारी पोलिसांसमोर हजर झाले. पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात डी. एस. कुलकर्णी आणि पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्यावर ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी महाराष्ट्रातीलठेवीदारांचे हितसंरक्षण कायदा तसेच भादंवि कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल आहे. 

डीएसके यांनी अटकपूर्व जामिनासाठी प्रथम जिल्ह्य न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान उच्च न्यायालयाने त्यांना अटी व शर्तींवर जामीन दिला होता. परंतु, अटी व शर्तींची पूर्तता न केल्यामुळे त्यांना मिळालेला जामीन रद्द करण्यात आला होता. या आदेशाविरोधात त्यांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.  

 सुनावणीच्या वेळी न्यायालयाने 7 ते 11 फेबु्रवारी या पाच दिवस सकाळी 11 ते 1 आणि 3 ते 5 या वेळात तपास अधिकार्‍यांसमोर हजर राहा, असे निर्देश दिले होते. त्यानुसार, डीएसके दाम्पत्य बुधवारी सकाळी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या तपास पथकासमोर हजर राहिले. पाच वाजेपर्यंत त्यांच्याकडे चौकशी सुरू होती. 
ते पुढील चार दिवस पोलिसांसमोर हजर राहणार आहेत. डीएसके यांच्या जामिनावर 13 फेबु्रवारी रोजी सुनावणी होणार आहे.