Mon, May 20, 2019 20:15होमपेज › Pune › आई-बापाचं छत्र हरपलेल्या झोपडपट्टीतील लेकरांचं स्वप्न पूर्ण होईल?

आई-बापाचं छत्र हरपलेल्या झोपडपट्टीतील लेकरांचं स्वप्न पूर्ण होईल?

Published On: Jul 24 2018 1:08AM | Last Updated: Jul 23 2018 11:56PMपुणे : प्रतिनिधी

त्यांची आई सात वर्षांपूर्वीच गेली,  वडिलांचाच काय तो आधार. गेल्या महिन्यात शॉक लागून तोही गेला अन् लेकरं पोरकी झाली. माझी पाच सांभाळून त्यांना सांभाळतोय ! हमाली करून कसंबसं भागवतोय. पण माझं वय कमी होणार, त्यांचं वाढणार अन् आता माझ्या पोरीही लग्नाला आल्यात, कसं होणार...?   आपल्या भावाच्या चार मुलांना पदरात घेऊन त्यांचे आई-बाप बनलेले भारत आणि लक्ष्मी कांबळे व्यथा सांगत होते; तेव्हा छत्र हरपलेल्या त्या लेकरांच्या डोळ्यात भविष्यातील अंधाराची भीती स्पष्ट जाणवत होती. 

जनता वसाहत येथे राहणार्‍या सीमा, राधिका, रोशन या चार मुली आणि अनिकेत या मुलांचा सांभाळ सध्या भारत आणि लक्ष्मी हेच करत आहेत. सात वर्षांपूर्वी त्यांच्या आईचं निधन झालं. गेल्या महिन्यात सिंहगड रोड इथं ट्रान्सफॉर्मरच्या विजेच्या धक्क्यानं वडिलांचा मृत्यू झाला अन् होत्याचं नव्हतं झालं. नकळत्या वयातच आई निघून गेल्यानं लक्ष्मी यांनीच मुलांना आईची माया दिली आणि आता भारत हेच त्यांचा आर्थिक आधार बनलेत. पत्र्याच्या शेडची एक खोली इतकाच काय तो आसरा. त्यांचं उठणं-बसणं, खाणं-पिणं काका-काकूच्या घरात. पण पोटच्या पाच लेकरांना सांभाळून आता नऊ लेकरांचे आई-बाब बनलेल्या कांबळे यांनाही आता भविष्याची चिंता सतावत आहे. 

“माझ्या अंगात रग आहे तोवर मी सांभाळीन. पण माझ्या पोरीही आता लग्नाला आल्यात, काय सुधरत नाही,” अशी व्यथा भारत यांनी व्यक्त केली. चारही पोरांना अभ्यासात गती आहे. सीमा नववीत, तर राधिका आठवीत आहे. विनवणी केल्यावर गोपाळ हायस्कूलनं त्यांच्या यावर्षीच्या फीचे पैसे माफ केले. रोशन आणि अनिकेत ‘नंदादीप’ शाळेत आहेत, त्यांनाही विनवणी करणार आहे, असं भारत यांनी सांगितलं. 

खर्च कधी काढला नाय..!

या मुलांवर किती खर्च होतो, या प्रश्‍नावर भारत उत्तरले, टेम्पो चालवून आणि हमाली करून महिन्याकाठी 18 ते 20 हजार रुपये मिळतात. यावर 11 जणांचा संसार चालतो. भावाची मुलं माझ्याकडंच राहतात. ती माझीच मानल्यानं त्यांचा वेगळा खर्च कसा काढणार? 

एकीला व्हायचंय पोलिस, तर दुसर्‍याला फौजी

खूप शिकून मला पोलिस व्हायचंच, अशी सीमाची इच्छा आहे, तर अनिकेतला फौजी व्हायचंय. लळा लावणारे काका-काकू मिळाल्यानं सध्यातरी त्यांच्या पोटातील भूकेची आग क्षमत आहे. पण शिकून मोठं होण्याचं स्वप्न कसं पूर्ण होणार, हा सवाल भारत यांना सतत सलत आहे.