Mon, Aug 19, 2019 10:10



होमपेज › Pune › सचिन अंदुरेच्या पोलिस कोठडीत १ सप्टेंबरपर्यंत वाढ 

लंकेश हत्येतील तिघांना डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी न्यायालयात हजर करणार 

Published On: Aug 30 2018 6:46PM | Last Updated: Aug 30 2018 6:46PM



पुणे : प्रतिनिधी

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी अमोल काळे, अमित दिग्वेकर, राजेश बंगेरा या तिघांना सीबीआयने डॉ.नरेंद्र दाभोलकर प्रकरणात अटक करून उद्या, शुक्रवार (दि.३१ऑगस्ट) पुणे येथील न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती सीबीआयच्या वकीलांनी आज, गुरूवारी न्यायालयात दिली. दरम्यान, डॉ.दाभोलकर प्रकरणात सचिन अंदुरेच्या पोलिस कोठडीत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एम.ए.सैय्यद यांनी दोन दिवस (१ सप्टेंबर) पर्यंत वाढ केली आहे. 

सदर तीन आरोपी हे सचिन अंदुरे याच्याशी डॉ.दाभोलकर हत्या प्रकरणात संर्पकात होते. दाभोलकर प्रकरणातील दोन हल्लेखोरांनी शस्त्रांचे प्रशिक्षण कुठे घेतले, त्यांना शस्त्रे कोणी पुरवली, गुन्हयात वापरलेली मोटारसायकल कुठे लपवून ठेवली आहे याबाबत चौकशी करावयाची आहे. गुन्हयात वापरलेली मोटारसायकल, शस्त्रे कुठे विल्हेवाट लावण्यात आली याबाबत अंदुरे याच्याकडे सखोल तपास करावयाचा आहे. सीबीआय सदर गुन्हयात वापरण्यात आलेली मोटारसायकल, पिस्तुल याचा शोध घेत असून त्यादृष्टीने अंदुरेकडे चौकशी करण्यात येत आहे. अंदुरे याला आज, गुरुवार (दि. ३० ऑगस्ट) न्यायालयात हजर करण्यात आले होते. सीबीआयचा तपास प्रगतीपथावर असून अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती आले आहेत. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी कळसकर याच्या कोठडीची मागणी करण्यात आली आहे. कळसकर आणि अंदुरे याचा एकत्रित तपास करायचा असल्याने अंदुरे याच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सीबीआयचे विशेष सरकारी वकील विजयकुमार ढाकणे यांनी केली.

कळसकर-अंदुरेची समोरासमोर चौकशी आवश्यक

सीबीआयने न्यायालयात सचिन अंदुरे याच्यासोबत डॉ.नरेंद्र दाभोलकर प्रकरणात दुसरा हल्लेखोर हा शरद कळसकर असल्याचे सांगितले आहे. सदर दोघांना समोरासमोर बसवून चौकशी करावयाची असल्याने दोन दिवस पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी सीबीआयचे वकील विजयकुमार ढाकणे यांनी न्यायालयात केली. त्यावर बचाव पक्षाचे वकील धर्मराज चांडेला यांनी आक्षेप घेत कळसकर हा तीन सप्टेंबर पर्यंत मुंबई एटीएसच्या कोठडीत असल्याने, सीबीआय त्याच्याकडे कशी चौकशी करणार असा प्रश्‍न उपस्थित केला. त्याबरोबर चार दिवसातील पोलिस कोठडीत काय तपास झाला याबाबत एकही मुद्दा  रिमांड अहवालामध्ये मांडला नसल्याचे अ‍ॅड. धर्मराज यांनी न्यायालयात सांगितले. 

परंतु, धर्मराज यांचा मुद्दा खोडून काढत अ‍ॅड. ढाकणे यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गोपनीयता बाळगली जात असून तपास झाला नाही असे म्हणता येणार नाही. केस डायरीमध्ये प्रत्येक दिवशी काय तपास झाला हे नमूद करण्यात आले. सीबीआयच्या वतीने याप्रकरणी दुसर्‍या तपास यंत्रणेशी चर्चा करुन समन्वयाने दोनही गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, नालासोपारा स्फोट प्रकरणात अटक करण्यात आलेला व डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा दुसरा शुटर शरद कळसकरच्या पोलिस कोठडीत वाढ झाल्याने त्याची दाभोलकर प्रकरणातील अटक लांबणीवर पडली आहे. सीबीआयकडे अंदुरेच्या पोलिस कोठडीचे काहीच दिवस शिल्लक असल्याने कळसकर आणि अंदुरेला समोरासमोर बसवून तपास कसा पडणार असा पेच निर्माण झाला होता. सीबीआयने न्यायालयात एटीएसची समन्वय साधून कळसकरकडे तपास करणार असल्याचे सांगितले. न्यायालयाने अतिरिक्त सरकारी वकील विजय कुमार ढाकणे यांनी केलेल्या युक्तीवादानंतर दोन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.  

दाभोलकर प्रकरणात तिघांची रेकी 

अमोल काळे, अमित दिगवेकर आणि राजेश बंगेरा  या तिघांनी अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या अनुषंगाने रेकी केल्याची बाब केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) केलेल्या तपासामध्ये निष्पन्न झाल्याने व गौरी लंकेश हत्या आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या कनेक्शन यानिमित्ताने उघड होण्याची शक्यता आहे. अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने 7.65 एमएमचे देशी बनावटीचे पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे सचिन अंदुरेला दिली होती.  अनिसचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर हल्ला करण्यासाठी 7.65 एमएम या पिस्तुलाचाच वापर झाला होता. या दोन्ही हत्यांसाठी एकाच पिस्तुलाचा वापर झाला काय, या दृष्टीने सीबीआय तपास करत आहे. याप्रकरणी न्यायालयाने चौघांविरोधात प्रॉडक्शन वारंट जारी केले आहे.  पुणे येथील शिवाजीनगर न्यायालयाने याप्रकरणी प्रॉडक्शन वारंटसाठी परवागनी सीबीआयला दिली आहे. शरद कळसकरचे यापूर्वीच प्रॉडक्शन वॉरंट निघाले असून सोमवारी काळे, बंगेरा आणि दिगवेकर यांच्या प्रॉडक्शन वारंटला परवानगी दिली आहे. कळसकरची पोलिस कोठडी संपल्यानंतरच त्याला दाभोलकर हत्येप्रकरणी न्यायालयात हजर करणे शक्य होणार आहे. 

युक्तिवाद मग वकीलपत्र

या प्रकरणात या पूर्वी झालेल्या सुनावणीमध्ये बचाव पक्षाच्या वतीने रर्वीं प्रकाश साळशिंगीकर यांनी युक्तिवाद केला मात्र काही कारणास्तव ते आज न्यायालयात येऊ शकले नाही. त्यामुळे त्यांच्या ऐवजी रर्वीं धरमराज यांनी बचाव पक्षाची भूमिका मांडली. वकील बदली झाल्यानंतर युक्तिवाद करणार्‍या वकिलाने पक्षकाराचे वकीलपत्र घेणे अपेक्षित आहे मात्र धरम राज ज्यांनी वकील पत्र न घेताच युक्तिवाद केला ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. त्यानंतर धरमराज यांनी अंदुरे याच्या वकीत्रापत्रावर सह्या घेतल्या.