Tue, Apr 23, 2019 23:42होमपेज › Pune › निवांतपणासाठी सासूचा खून

निवांतपणासाठी सासूचा खून

Published On: Aug 02 2018 7:28PM | Last Updated: Aug 03 2018 12:43AMपुणे : प्रतिनिधी

घरात निवांतपणा मिळावा आणि घरातील कामावरून होणार्‍या वादातून सुनेने सख्खी बहीण आणि तिच्या मित्राच्या मदतीने सासूला गुंगीच्या गोळ्या देऊन डोक्यात कुकरने मारहाण तसेच दुपट्ट्याने गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इतकेच नव्हे, तर सूनेने यानंतर सासूचा अपघात झाल्याचा बनाव करून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, कोंढवा पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी हा बनाव काही वेळात उघडकीस आणला. दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

फरजाना अश्पाक शेख (वय 45, निम्रा टॉवर, साई सर्व्हिसजवळ, कोेंढवा) असे खून झालेल्या सासूचे नाव आहे. याप्रकरणी सून आफरीन इरफान शेख (वय 22) आणि सुनेच्या अल्पवयीन बहिणीचा मित्र आसिफ हुसेन शेख (वय 20, म्हसोबा मंदिराजवळ, कासेवाडी) या दोघांना अटक केली आहे. तर, अल्पवयीन बहिणीला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींच्या मुलाचे आफरीन हिच्याशी फेब्रुवारी महिन्यात लग्न झाले होते. त्यांचा मुलगा चालक म्हणून काम करतो. तो बाहेर गेल्यास सून-सासू एकट्याच घरात असायच्या. दरम्यान त्यांच्यात घरातील कामावरुन नेहमीच वाद होत असत. तसेच, सासू घरी असल्याने आरोपी आफरीन हिला निवांत राहता येत नव्हते. त्यामुळे तिच्या मनात राग होता. त्यामुळे तिने सासूचा खून करण्याचा कट रचला. त्यानुसार, सोमवारी मुलगा इरफान कामाला गेला. त्यानंतर दुपारी (30 जुलै) सुनेने सुप पिण्यास देऊन त्यात गुंगीच्या गोळ्या टाकल्या. सासू बेशुद्ध होताच मित्राला बोलावून घेत हत्या करण्याचा कट तिने सांगितला. पण तो याला नकार देऊन बाहेर पडला. त्यानंतर तिने छोट्या बहिणीला बोलावले. बहिण व तिचा मित्र दोघे आले.

त्या तिघांनी सासूला कूकरने डोक्यात बेदम मारहाण केली. सूनेने ओढणीने सासूचा गळा आवळला. सासू निपचित पडलेल्याने सासूचा मृत्यू झाल्याचे वाटले. त्यामुळे आरोपींनी त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. मात्र, तेथून त्यांना ससून रुग्णालयात नेण्यास सांगितले. ससूनमध्ये दाखल करताच डॉक्टरांनी तपासून त्या जीवंत असल्याचे समजले. मग, डॉक्टरांनी याबाबत त्यांचेकडे चौकशी केली. त्यावेळी अपघातात जखमी झाल्याचे डॉक्टरांना सांगितले. मात्र तत्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. रात्र गस्तीवर असणारे कोेंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मिलींद गायकवाड यांनी धाव घेऊन हा बनाव उघडकीस आणला. दरम्यान फरजाना यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचा गुरुवारी सायंकाळी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. त्यात खूनाच कलम वाढविण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.